आष्टी : परतूर तालुक्यातील लिखित पिंपरी शिवारात बुधवारी (ता. ३०) उघडकीस आलेल्या खून प्रकरणाचा आष्टी पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. पैशाच्या वादातून आणि दारूच्या नशेत मित्रानेच आपल्या मित्राचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गुलाब कदम हे मंगळवारी (ता. २९) आपल्या पत्नीचे कानातील झुंबर घेऊन सेलू येथे शेतासाठी खते आणण्यासाठी गेले होते. मात्र, ते दिवसभर घरी परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी, लिखित पिंपरी शिवारातील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी सुमारे २० किलो वजनाचा रक्ताने माखलेला दगड, दोन देशी दारूच्या बाटल्या आणि दोन ग्लास जप्त केले. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी श्रीरंग पांडुरंग दराडे (रा. आडगाव दराडे, ता. सेलू, सध्या मुक्काम लिखित पिंपरी) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दराडे याने सांगितले की, दोघे मिळून सेलू येथे गेले होते. तिथे पत्नीच्या झुंबरावर ३३ हजार रुपये मिळवले. हे पैसे घेऊन दोघे शेतातील शेडमध्ये आले आणि दारू प्यायला सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने लक्ष्मणकडे कपड्यांसाठी पैसे मागितले, मात्र नकार मिळाल्याने आणि पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून, लक्ष्मण झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर त्याच्या खिशातील ३२,५०० रुपये घेऊन एका मठात जाऊन कपडे धुतले व पैसे लपवले.
पोलिसांनी आरोपीकडून लपवलेले पैसे जप्त केले आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला पुढील चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या तपासात पोलिसांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.