जालना ः मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल, पाणी वेस, मोती बाग वेस, घाणेवाडी तलाव, हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर स्मारक आदी बाबी जालना शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आहेत. या संसाधनावर देखभाल दुरुस्तीअभावी अवकळा पसरली आहे. सत्ता संघर्षात नेते, उमेदवार, कार्यकर्त्यांना या वैभवाचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जालना शहराला नाट्यचळवळीचा मोठा वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी जालना शहरातील कै. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह एक व्यासपीठ आहे. परंतु, बऱ्याच वर्षांपासून देखभाल दुरुस्तीअभावी हे नाट्यगृह बंद अवस्थेत आहे. नाट्यगृह सुरू करण्यासाठी विविध संस्था, संघटनांकडून महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, नेत्यांकडून आश्वासनाशिवाय दुसरे उत्तर मिळत नाही.
घाणेवाडी तलावाच्या सांडव्याला बऱ्याच ठिकाणी तडे गेले आहेत. पावसाळ्यात या तड्यातून पाणीदेखील वाहिले आहे. तो प्रश्न अजून सुटलेला नाही. हा प्रश्न तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कानावर घालण्यात आला होता. लघु पाटबंधारे माध्यमातून पिचिंगचे काम केल्या जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, ते देखील अधांतरीच राहिले आहे.
पाणी वेस आणि कचेरी रोड जुना जालना शनिमंदिर चौकातील वारंवार होणाऱ्या रहदारीवर अजून उपायोजना सुटलेल्या नाही. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्याच प्रमाणे गाड्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. मात्र, वाढते अतिक्रमण, रस्त्यात लावण्यात येत असलेल्या गाड्या यामुळे रस्ते अरुंद होत आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना रोजच्याच रहदारीला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या कशी सुटेल, याकडे देखील महानगरपालिका ताब्यात घेऊ पाहाणाऱ्या नेत्यांनी पाहिले पाहिजे.
शहरातील लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला लागूनच हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर यांचे स्मारक आहे. महानगर पालिकेच्या मालकीच्या जागेत ते उभारण्यात आले आहे. हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर यांचा मराठवाडा मुक्तिसंग्रामात सक्रिय सहभाग राहिलेला आहे. आज त्यांच्या स्मारकाला अवकाळा आली आहे. या स्मारकात पूर्वी वाचनालय होते. मात्र, या स्मारकाची अत्यंत दयनिय अवस्था निर्माण झाली. या परिसराच्या विकासाकडे देखील नेत्यांनी बघितले पाहिजे, अशी अपेक्षा आहे.
जलतरण तलाव बंद अवस्थेत
जालना शहरातील जलतरणाची आवड असलेल्यांसाठी मोती बाग तलावाशेजारी जलतरण तलाव उभारण्यात आला आहे. मात्र, बऱ्याच वर्षांपासून जलतरण तलाव बंद अवस्थेत आहे. येथे कोणत्याही स्पर्धा होत नाही. या जलतरण तलावाचे रुपडे केव्हा बदलेल, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.