शहर महानगरपालिकेला शासनातर्फे धूर उडविणाऱ्या तीन मशीन, एक बुलडोझर व दोन घंटागाड्या उपलब्ध झाल्या.  ( छाया ः किरण खानापुरे)
जालना

Jalna garbage management : महापौर-उपमहापौरांनी घेतला शहर स्वच्छतेचा आढावा

स्वच्छता कर्मचाऱ्यांना सकाळी सहा वाजता हजेरी बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना शहरातील विविध वॉर्डांत स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर सोमवारी महापौर वंदना मगरे व उपमहापौर राजेश राऊत यांनी शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला. बैठकीत शहरातील साफसफाई व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आले आहेत.

जालना शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. सोमवारी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि उपसभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शहरातील साफसफाई व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी झालेल्या बैठकीत स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम यांनी विभागातील सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी दररोज सकाळी 6.00 वाजेपूर्वी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाहन विभागानेही घंटागाडी चालकांची हजेरी सकाळी 6.00 वाजता घेऊन त्याचा अहवाल अधिकृत ग्रुपवर टाकण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील कचरा संकलन वेळेत पूर्ण करण्यासाठी नादुरुस्त असलेल्या (विशेषतः इलेक्ट्रिक) घंटागाड्या तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश वाहन विभागाला दिले आहेत. घंटागाडी वेळेवर येते की नाही, याची नोंद घेण्याची जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांवर सोपवण्यात आली आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाई करून त्यातील गाळ त्वरित उचलण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य रस्त्यावरील कचरा डेपो हटवून त्या ठिकाणचे आधीचे व नंतरचे जिओ-टॅग फोटो काढावेत असे सूचीत केले.

सहकार्य करावे

पावसाळ्यापूर्वी मोठे नाले स्वच्छ करून भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. सोबतच, सफाई कर्मचाऱ्यांना नवीन साड्या, गणवेश आणि सुरक्षा साधने (गमबूट, हँडग्लोव्हज, मास्क) लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.स्वच्छ जालना, सुंदर जालना या मोहिमेत नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जालना महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT