

मुकेश भारव्दाज
जाफराबाद ः तालुक्यातील बोरगाव बु. येथे 15 व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या पाईपलाईन कामातील अनियमितता व कामाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त करत मार्तंड बाबूराव काळे यांनी थेट नव्या पाण्याच्या टाकीवर चढून 23 मार्च पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच असून, प्रशासनासमोर हे मोठे आव्हान आहे.
बोरगाव बु.येथे गटविकास अधिकारी देविदास मगर यांनी घटनास्थळी भेट देत मार्तंड काळे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, दोषींवर ठोस कारवाई आणि संबंधित वस्तीला प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा काळे यांनी घेतल्याने पेच वाढला आहे.
धनगर वस्ती व झोपडपट्टी भागासाठी करण्यात आलेली पाईपलाईन केवळ कागदावरच असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. प्रत्यक्षात नागरिकांना पाण्याचा थेंबही मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यापूर्वी पंचनामा करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने हा प्रश्न अधिकच चिघळला आहे.
दरम्यान, उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची 24 मार्च रोजी आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली असून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. उपोषणस्थळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत काळे यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी महिलांचा आक्रमक ‘रणरागिणी’ अवतार पहायला मिळाला.
पोलिस बंदोबस्त
उपोषणस्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आरोग्य अधिकारी, वैद्यकीय पथक, पोलिस कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रशासन या प्रकरणात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.