child marriage  pudhari photo
जालना

Child marriage prevention : बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट

अक्षयतृतीयेचा मुहूर्त, एप्रिल 2025 ते मार्च 2026 पर्यंत रोखले 136 बालविवाह

पुढारी वृत्तसेवा

जालना ः अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर 19 एप्रिल रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडणार आहेत. मात्र, या मुहूर्ताचा गैरफायदा घेऊन बालविवाह उरकले जाण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर आली आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी याबाबत सर्व संबंधित विभागांना सतर्कतेचे आदेश दिले असून, बालविवाहाचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत सुमारे 136 बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर नागरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.

बालविवाहाची माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. चाईल्ड हेल्पलाईन 1098, पोलिस नियंत्रण कक्ष 112, इतर कार्यालये जवळचे पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा बालसंरक्षण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व महिला बाल विकास विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

बालविवाहाची तयारी सुरू असल्याची कुणकुण लागताच नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला कळवावे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार, विवाहासाठी मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी होऊ शकतात.
आर. व्ही. कड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी , जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT