Jalna bright headlights problem pudhari photo
जालना

Jalna News : नियम धाब्यावर, हेडलाईट डोळ्यावर!

प्रखर हेडलाईटमुळे अपघाताचा धोका वाढला

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात वाहनांना नियमबाह्य पद्धतीने बसविण्यात येणाऱ्या प्रखर हेडलाईटमुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या डोळ्यांवर मोठा ताण येत असून अपघातांचा धोका वाढला आहे. समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईटचा तीव्र व प्रखर प्रकाश थेट डोळ्यांवर पडल्याने काही क्षणांसाठी रस्ता आणि समोरील वाहन दिसेनासे होते. त्यामुळे दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सध्या बाजारात विविध प्रकारचे अत्यंत प्रखर एलईडी हेडलाईट सहज उपलब्ध होत आहेत. पाच हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंत खर्च करून अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रकाश देणारे हेडलाईट बसविले जात असल्याचे चित्र आहे. विशेषतः दुचाकींवर अशा प्रकारचे हेडलाईट बसविल्यानंतर त्यांचा प्रकाश समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर थेट पडतो.

अनेक वाहनधारक शहरासह महामार्गावरही हे हेडलाईट लो-बीमऐवजी हाय-बीमवरच ठेवत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे. जालना पोलिस विभागाकडुन अपघात स्पॉट शोधून त्याबाबत उपाययोजना करण्यात येत असतांना अपघात कमी करण्यासाठी वाहनांच्या प्रखर हेड लाईटवरही कारवाई होणे गरजेचे आहे.

रात्रीच्या वेळी समोरून आलेल्या वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे काही सेकंद दृष्टी धूसर झाल्यास वाहनाचा वेग नियंत्रित करणे कठीण होते. अशावेळी दुचाकीस्वाराचा तोल जाणे, रस्त्याच्या कडेला अथवा दुभाजकावर वाहन आदळणे किंवा समोरच्या वाहनाला धडक होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रखर हेडलाईट हा केवळ वाहनचालकांच्या त्रासाचा विषय नसून रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे.वाहनांमध्ये नियमबाह्य हेडलाईट बसविणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.

कारवाईची गरज

प्रखर व नियमबाह्य हेडलाईटवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस आणि आरटीओ विभागाने विशेष मोहीम राबवून वाहनांची तपासणी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. रात्रीच्या वेळी हाय-बीमचा गैरवापर करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT