भोकरदनचा पाणीपुरवठा : देव देतो पण कर्म नेते file photo
जालना

भोकरदनचा पाणीपुरवठा : देव देतो पण कर्म नेते

भोकरदन शहरास पाणीपुरवठा करणारा जुई मध्यम प्रकल्पात पाणी नसल्याने खडकपूर्णा धरणातून शहरासाठी पाणी आणण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Jalna bhokardan water supply

रवींद्र देशपांडे

भोकरदनः भोकरदन शहरास पाणीपुरवठा करणारा जुई मध्यम प्रकल्पात पाणी नसल्याने खडकपूर्णा धरणातून शहरासाठी पाणी आणण्यात आले. मात्र शहरातील अंतर्गत पाणी पुरवठा व्यवस्था सक्षम नसल्याने शहरवासीयांना पंधरा-पंधरा दिवस पाण्यासाठी वाट पहावी लागत असल्याने शहरवासीयांची अवस्था दैव देते अन् कर्म नेते अशी झाली आहे.

भोकरदन शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या जुई मध्यम प्रकल्प कोरडा पडल्याने भोकरदन शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. नगर परिषद पदाधिकारी, प्रशासनाने आमदार संतोष दानवे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नामुळे युद्ध पातळीवर काम होऊन दिवाळीच्या मुहूर्तावर विदर्भातील देऊळगाव मही येथील खडकपूर्णा धरणाचे पाणी भोकरदन शहरात दाखल झाले. शहरातील जुन्या व कुचकामी पाणी पुरवठा यंत्रणेमुळे खडकपूर्णाचे पाणी येऊनही शहरातील पाणीपुरवठा सुरुळीत झाला नाही. खडकपूर्णाचे पाणी शहरात येऊन ते नागरिकांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी पंधरा दिवस वाट पहावी लागत आहे.

खडकपूर्णाचे पाणी भोकरदन शहरात येणे अवघड होते. मात्र ते आव्हान आ. संतोष दानवे यांनी यशस्वीपणे पूर्ण करून पाणी शहरात आणले. मात्र जीर्ण व कुचकामी झालेली पाइपलाईन व जलशुद्धीकरण केंद्रामुळे खडकपूर्णाचे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत आणण्यात अडचणी येत आहे.

पाणीपुरवठ्याचा दाब वाढविल्यास पाईपलाईन फुटून पाणी गळती होत असल्याने शहरवासीयांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करता येत नाही. जीर्ण झालेल्या पाणी पुरवठ्याच्या पाईप भोकरदन नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखीचे ठरत असल्याचे दिसत आहे. आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल.

खडकपूर्णा धरणातून आलेल्या पाण्याचे व्यवस्थापन सध्या सुरू असून येत्या सात ते आठ दिवसांत हे व्यवस्थापन पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसाला होणारा पाणीपुरवठा सहा ते सात दिवसांवर येणार आहे.
अजय व्यवहारे, अभियंता पाणीपुरवठा विभाग, न.प. भोकरदन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT