Bhokardan Husband Death Case
भोकरदन : तालुक्यातील वाकडी शिवारात २६ वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याचे भासवून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या कथित प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने तिच्या साथीदाराने मित्राच्या मदतीने कट रचून तरुणाला दुचाकीने धडक देत ठार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात मृत तरुणाच्या पत्नीसह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम येडुबा वाघ (वय २६, रा. वाकडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील येडुबा राजाराम वाघ (वय ५४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोपान संजय जाधव, रवी महादू चिंचपुरे (दोघे रा. वाकडी) आणि पुनम उर्फ छकुली शुभम वाघ (रा. रांजणगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुभमचा विवाह नोव्हेंबर २०२४ मध्ये पुनम उर्फ छकुली हिच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांनी दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू झाले. दरम्यान, पुनम हिचे रवी चिंचपुरे याच्यासोबत कथित प्रेमसंबंध असल्याची माहिती शुभमच्या कुटुंबीयांना मिळाली होती.
शुभमने पत्नीसोबत नांदण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर रवी चिंचपुरे याने ४ जुलै रोजी शुभमला कथितरीत्या ‘दावा मागे घे, अन्यथा तुझा काटा काढीन,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.५५ वाजता शुभम हा भोकरदन रोडवरील आपल्या शेतात झोपण्यासाठी पायी जात होता. वाकडी-भोकरदन रस्त्यावर कैलास चिंचपुरे यांच्या शेताजवळ सोपान जाधव याने दुचाकीने शुभमला जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेतील शुभमला उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे दिसून आले. मात्र, पोलिस तपास आणि तक्रारीतील आरोपांनुसार पत्नी पुनम, तिचा कथित साथीदार रवी चिंचपुरे आणि सोपान जाधव यांनी कट रचून शुभमला दुचाकीची धडक देत त्याची हत्या केली आणि त्यानंतर अपघाताचा बनाव केल्याचे समोर आले.
आपल्या मुलाचा मृत्यू अपघातात झाला नसून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत येडुबा वाघ यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विविध स्तरांवर दाद मागत त्यांनी मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. त्यांच्या तक्रारीनंतर प्रकरणाची चौकशी होऊन खुनाचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सोनावणे करीत आहेत.