Jalna Bhokardan Illegal Water Diversion  Pudhari
जालना

Jalna Water Crisis | सार्वजनिक विहिरीचे पाणी वळविले शेतीकडे; पारध गाव १५ दिवसांपासून पाणीटंचाईच्या विळख्यात

विशेष म्हणजे गावालगत धरण असून सरकारी विहिरीतही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे अधिकृत पंचनाम्यात स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

Jalna Bhokardan Illegal Water Diversion

सागर राजे देशमुख

पारध : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बु. गावात गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे गावालगत धरण असून सरकारी विहिरीतही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे अधिकृत पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे. तरीदेखील गावातील नळयोजनेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाण्यासाठी महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच इतर ग्रामस्थांना लांब अंतराची पायपीट करावी लागत आहे. याचदरम्यान सरकारी विहिरीतील पाणी खासगी पाइपलाइनद्वारे शेतीसाठी वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकत्याच झालेल्या पंचनाम्यात ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सरकारी विहिरीची पाहणी केली. यावेळी माजी सरपंच परमेश्वर पाटील लोखंडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. पंचनाम्यात विहिरीत पुरेसे पाणी असल्याचे दिसून आले. मात्र हे पाणी गावाच्या पिण्याच्या गरजांसाठी वापरण्याऐवजी शेतीकडे वळवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

गावाजवळ धरण, विहिरीत पाणी आणि तरीही कोरडे नळ अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे “पाणी उपलब्ध आहे; मात्र योग्य नियोजनाचा अभाव आहे,” अशी भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. नागरिकांनी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर टीका करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, सार्वजनिक जलस्रोतांचा गैरवापर थांबवावा आणि गावाला नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच पाणीटंचाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

धरणाच्या सान्निध्यात आणि जलस्रोत उपलब्ध असतानाही पारध बु. गावातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने हा प्रश्न केवळ पाणीटंचाईपुरता मर्यादित न राहता स्थानिक प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींचे उदाहरण ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT