

जालना: जिल्ह्यातील शेवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाहेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दोन घरांमध्ये घुसून तब्बल ३ लाख ४९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष वाघु राठोड (रा. पाहेगाव) यांचे कुटुंब १३ जूनच्या रात्री घरात व अंगणात झोपले होते. पहाटेच्या सुमारास आवाज आल्याने पाणुबाई राठोड यांना जाग आली. त्यावेळी कोणीतरी त्यांच्या नाकातील सोन्याची नथ ओढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान, चोरट्यांनी संतोष राठोड व त्यांचे चुलते राघु मानसिंग राठोड यांच्या घरातील लोखंडी पेट्या व कपाटांची कुलपे तोडून दागिने आणि रोख रक्कम चोरली. चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याची नथ, एकदानी, काडी पोत, झुंबर, वेल, सोन्याचे मणी, चांदीचे दागिने व रोख रकमेचा समावेश असून एकूण नुकसान ३ लाख ४९ हजार रुपये इतके आहे.
घटनेची माहिती मिळताच शेवली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सलीम महमद शेख पुढील तपास करीत आहेत.