Bhokardan Tadipar Youth Arrested
भोकरदन : तालुक्यातील हसनाबादजवळील लतीफपूर येथे हद्दपार करण्यात आलेल्या एका युवकाकडून गावठी पिस्तूल जप्त करत हसनाबाद पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २३) करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख जुनेश शेख आरेफ (वय २५, रा. लतीफपूर, ता. भोकरदन, जि. जालना) हा हद्दपार असतानाही नातेवाईकांना भेटण्यासाठी गावात आल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत हसनाबाद पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून संशयिताचा शोध सुरू केला.
लतीफपूर येथे आरोपी आढळल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्याकडे शस्त्र असल्याचा संशय आल्याने झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले.
यानंतर आरोपीला शस्त्रासह हसनाबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सहकारी तायडे करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक सहकारी तायडे तसेच पोलीस कर्मचारी सागर देवकर, दीपक सोनुने, भाऊसाहेब पवार, उमेश पवार आणि नारायण चरावंडे यांनी पार पाडली.