

Kailas Pawar murder case: Two female accused arrested
जालना, पुढार वृत्तसेवा : शहरातील दरेगाव परिसरातील वनक्षेत्रात झालेल्या कैलास दत्तू पवार यांच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोन महिला आरोपींना मानेगाव येथून जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईमुळे खून प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे.
जालना शहरातील इंदेवाडी येथील मिनाबाई कैलास पवार यांनी १९ एप्रिल २०२६ रोजी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली होती. त्यात १७ एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यान दरेंगाव येथील वनक्षेत्रात कैलास दत्तू पवार यांचा संगनमताने जीवे मारून खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी विकी मांडोळ याच्यासह दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील फरार महिला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी दोन्ही महिला (रा. रमाबाईनगर, जालना) या मानेगाव येथे असल्याच माहीती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मानेगाव येथे जाऊन दोन्ही महिला आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना तालुका पोलीस ठाणे, जालना येथे हजर करण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींमुळे तपासास गती मिळणार आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वीर सिंह संधू, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.