Ambad Taluka Two Minor Children Killed
शहागड : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे शुक्रवारी (दि.२९) दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत पडीक घराची भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत मुलांमध्ये शौर्य गोरख कासार (रा. हादगाव) आणि चैतन्य राधाकिसन भिसे (वय अंदाजे १२, रा. मारफळा, ता. गेवराई) यांचा समावेश आहे. चैतन्य भिसे हा मामाच्या गावी घुंगर्डे हादगाव येथे आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोघेही गावालगत असलेल्या एका पडीक घराजवळ खेळत होते. यावेळी अचानक जीर्ण अवस्थेतील भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने दोन्ही मुलांना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी गावातील जीर्ण आणि पडीक इमारतींची तातडीने पाहणी करून धोकादायक बांधकामांवर आवश्यक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.