जालना ः स्व. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांना आयोजित सर्वपक्षीय श्रध्दांजली कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करताना आमदार अर्जुनराव खोतकर. pudhari photo
जालना

Tribute to Ajitdada Pawar : शहरात सर्वपक्षीय बंद; दादांना श्रद्धांजली!

श्रद्धांजली सभेत मान्यवर गहिवरले; बड्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या आठवणी केल्या ताज्या

पुढारी वृत्तसेवा

जालना: शहरात सर्व पक्षीय बंद पाळण्यात आला असून दिवंगत नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बंदला सर्व राजकीय पक्ष, व्यापारी संघटना व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बंदमुळे जालना शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद राहिल्या असून बाजार समिती आवारात दिवसभर शुकशुकाट दिसून आला.

दरम्यान, अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदविला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते. या वेळी विविध ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले. सर्व पक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व नागरिकांनी एकत्र येत अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळले.

महाराष्ट्राच्या राजकारणात व विकास प्रक्रियेत अजितदादांचे योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याची आठवण उपस्थितांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी भवन येथे आयोजित सर्व पक्षीय शोकसभेत नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, अजितदादा हे विकासाभिमुख नेतृत्व होते. संकटाच्या काळात त्यांनी तत्काळ निर्णय घेऊन जनतेला दिलासा दिला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

जालना ः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले. सर्वपक्षीय बंदमध्ये सहभागी झाले.

दरम्यान, बंद शांततेत पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रशासन व पोलिसांनी दक्षता घेतली होती. जालना शहराने एकजुटीने बंद पाळून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आदरांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभागृहात आयोजित सर्व पक्षीय शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे होते.

यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष भास्कर दानवे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भास्कर अंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद, राजेश राऊत, रिपाइं नेते ॲड. ब्रह्मानंद चव्हाण, कामगार नेते अण्णा सावंत, काँग्रेसचे राजेंद्र राख, कल्याण दळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, रशीद पहेलवान, अण्णासाहेब चित्तेकर, अन्वर मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, आतिकखान, शंकुतला कदम, मंगलताई पाटील , रिकंल तायड , बदर चाऊस, शीतलताई बारोटे, सगीर अहेमद, नितीन जेथलिया, सुनील आर्दड , राम सावंत, शाह आलमखान,राजेंद्र गोरे, बाला परदेशी, संजय दाड , प्रा. सोपानराव तेलगड , साईनाथ चिन्नादौरे , विरेंद्र धोका, वसंत जाधव , संजय इंगळे , शरद देशमुख , सिद्धीविनायक मुळे, संतोष ढेंगळे , कृष्णा पडुळ, अविनाश कव्हळे , प्रभाकर घेवंदे , सतीश वाहुळे, कैलास मगरे, महेंद्र रत्नपारखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वसामान्यांशी नाळ जोडणारे नेतृत्व हरपले- स्व. अजितदादा पवार हे जनतेच्या प्रश्नांसाठी सतत झटणारे नेतृत्व होते, असे सांगितले. सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत आणि विकासासाठीची बांधिलकी कायम लक्षात राहील, असे त्यांनी नमूद केले.
भास्कर दानवे, भाजपा जालना शहर जिल्हाध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT