आजुबाई देवी 
जालना

Jalna|आजुबाई देवी आदिशक्तीचे आठवे रूप: नवरात्रौत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

Jalna Ajubai Devi Navratri| आजुबाई देवी आदिशक्तीचे आठवे रूप: नवरात्रौत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

पुढारी वृत्तसेवा

आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील आजुबाई देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले. दरम्यान नवदुर्गोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून आजुबाई देवीची शक्तीपीठे भक्तांच्या गर्दीने फुलणार आहेत. सोमवारी सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त साधून यावेळेत देवीचे घरोघरी नऊ दिवस विराजमान झाल्याने सर्वत्र भक्तीमय जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजुबाई देवी प्रसिद्ध माता जगदंबेच्या आठ रूपांपैकी भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील आजुबाई देवी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी देवीचे दोन मंदिर असून गावात जन्मस्थळ आहे, तर दुसरे मंदिर गावाच्या बाहेर समाधीस्थळ असून गावातील देवीची पुजा, अर्चना सोनू महाराज, दिपक महाराज करतात, तर गावाबाहेरच्या देवीची पुजा, अर्चा रवि महाराज, प्रफुल्ल महाराज करतात. त्यामुळे दोन्ही मंदिरात नवराञोत्सवास निमित्त येथे भाविकांची गर्दी असते.  

आजुबाई नवरात्र उत्सव वर्षातून दोन वेळा म्हणजेच एक चैत्र महिन्यात तर दुसरा आश्विन महिन्यात नवरात्रोत्सवात साजरा करण्यात येतो. या उत्साहाला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने आजुबाई देवी दर्शनासाठी दरवर्षी येतात. आन्वा येथे आजुबाईचे जन्मस्थळ असून इ.स. सुमारे ५०० वर्षांपूर्वी तुकारामपंत व त्यांची पत्नी चंद्रिका हे येथे राहत होते. ते माता जगदंबेचे उपासक व भक्त असून त्यांचा सुखी संसार होता. परंतु, त्यांच्या पोटी संतान नसल्याने ते दु:खी होते. तुकारामपंत दररोज जुई नदीकाठी असलेले केदारेश्वर महादेव मंदिरात जाऊन पुजा अर्चा करायचे, एके दिवशी ते केदारेश्वराला जात असताना त्यांना एका संताचे दर्शन झाले.

तुकारामपंतानी त्यांना आपल्या घरी जेवायला बोलावण्याचे निमंत्रण संताना दिले या निमंत्रणाला स्वीकारून ते पंताच्या घरी जेवायला आले, आणि संताला पंतानी जेवण वाढून दिले असता त्यांनी पंताच्या मुलाला जेवण्यास बोलवण्यासाठी सांगितले. यावेळी तुकारामपंतानी आम्हाला संतान नाही असे म्हणताच आम्ही निपुञिकाच्या घरी जेवत नाही, असे सांगून संत निघून गेले. हे पाहून तुकारामपंत व त्यांची पत्नी चंद्रिका रडू लागल्याने संतांनी दोघांना निलांबेला जाऊन अनुष्ठान करण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल, असे सांगितले.

संतांनी सांगताच पोटी संतान नाही, मग धनदौलत कशासाठी म्हणून त्यांनी आपली सर्व संपत्ती नातलगाच्या स्वाधीन करून निलांबेला (ञ्यंबकेश्वराच्या पर्वतावर) जाऊन कठोर व्रत व तपश्चर्या केली. त्यांच्या कठोर तपश्चर्या पाहून माता भगवती निलांबेने स्वप्नात येऊन तुळजापूर जाऊन सप्तशक्ती पाठ, पुजाभक्ती, करण्यास सांगितले. त्यानंतर नवरात्र उत्सव आला. लोक नवरात्र उत्सव साजरा करत होते. त्यामुळे पंत त्रस्त होते की, एवढ्या दिवसानंतर भगवतीची कृपा आपल्यावर का होत नाही. म्हणून त्यांनी मरण पत्कारण्याचा विचार केला. त्याच क्षणी भगवती माता प्रकट झाली व मातेने त्याला मीच तुझ्या घरी जन्म घेईल असे सांगितले.

काही दिवसांनी चैत्र शुद्ध चतुर्थी शके १४९४ रोजी सकाळीच चंद्रिका यांची प्रसूती झाली आणि मातेचा जन्म झाला. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. मातेचे नाव आजुबाई ठेवण्यात आले असून आजुबाई आपल्या बाललीला करून अनेक चमत्कार दाखवून आजुबाई प्रसिद्ध झाली, अशी अख्यायिका आहे.

आन्वा पुर्वी नाव अनंतपूर या नावाने ओळखले जात होते. आजही आन्वा गावात आजुबाई देवीची मंदिरात स्वयंभू दर्शनीय मूर्ती पहायला मिळते. तसेच चैञ महिन्यात नवराञोत्सवास साजरा केला जातो. यावेळी प्रथम आजुबाई देवीची स्वारी पूर्वी तुकारामपंत घेतली, त्यानंतर सन १९६२ ते २००३ लक्ष्मीकांत महाराज स्वारी घेत असत. सद्गुरू लक्ष्मीकांत महाराज हे ब्रम्हज्ञानी, तपस्वी, आजन्म ब्रम्हचारी व आजुबाई चरणी वाहिलेले परम तपस्वी महानॠषी होते. त्या अनुषंगाने १९९९ मध्ये आन्वा येथे महालक्षीचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या महालक्षीचंडी यज्ञाला देशभरातून लाखो भाविक आले होते. तसेच २००४ पासून सोनू महाराज हे आजुबाई देवीची स्वारी घेत असून ही परंपरा आज कायम आहे

आजुबाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवात दररोज पहाटे साडेसहा वाजता आजुबाई मातेची महापूजा, सकाळी ८ ते १० आणि दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत दुर्गा सप्तशती पाठ वाचन, सायंकाळी ५.३० ते ६.३० संजीवन हरिपाठ, सायंकाळी ६.४५ वाजता महाआरती तर रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत हरिकिर्तनाचा कार्यक्रम होणार असून उद्यापासून भजन, कीर्तन, प्रवचनासह विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. मंदिरात अष्टमीला होमहवन केले जाईल. तर महानवमीला होमहवनानेच नवरात्रौत्सवाचे समापन होईल. नवमीनंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाणार असल्याचे प.पू. सोनू महाराज यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT