

शरद मुळे
सुखापुरी:अंबड तालुक्यातील रुई परिसरातून वाहणाऱ्या मुसाभद्रायणी नदीच्या पाण्याची यंदाची भयावह स्थिती दुष्काळाची तीव्रता अधोरेखित करत आहे. गेल्या वर्षी याच नदीवरील कोल्हापुरी बंधारा पाण्याने तुडुंब भरलेला होता. बंधाऱ्यावरून वाहणारे पाणी, परिसरात निर्माण झालेले जलसाठे आणि हिरवागार झालेला नदीकाठ हे चित्र ग्रामस्थांच्या डोळ्यांसमोर आजही आहे. मात्र, यंदा त्याच बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याचे चित्र समोर आले आहे. जिथे गेल्या वर्षी पाणी साचले होते, तिथे आज कोरडी जमीन, दगडधोंडे आणि उजाड नदीपात्र दिसत आहे. निसर्गाच्या या बदलाने शेतकरी आणि ग्रामस्थांच्या चिंतेत भर घातली आहे.
पाण्याचा साठा गायब; नदीपात्राची तहान कायम
गेल्या वर्षी पावसामुळे मुसा -भद्रायणी नदीला आलेला प्रवाह आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात झालेला जलसाठा परिसरातील शेतीसाठी दिलासादायक ठरला होता. मात्र, यंदा पावसाने पुरेशी साथ न दिल्याने नदीपात्र कोरडे पडले असून बंधाऱ्यातील पाणीसाठाही आटल्याचे चित्र आहे. दोन्ही वर्षांतील परिस्थितीची तुलना करणारी छायाचित्रे दुष्काळाचे वास्तव स्पष्टपणे दाखवतात. एका छायाचित्रात पाण्याने भरलेला बंधारा दिसतो, तर दुसऱ्या छायाचित्रात त्याच ठिकाणी पाण्याऐवजी कोरडे नदीपात्र नजरेस पडते.
दुष्काळाची तीव्रता वाढत असताना रुई गावात पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी दोन टँकर सुरू करण्यात आले आहेत. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणे ही परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव करून देणारी बाब आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. आगामी काळात पाण्याची मागणी वाढल्यास पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.
शेती संकटात; मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर
पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप पिकांच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापूस, सोयाबीन, मका आणि तूर यांसारख्या पिकांसाठी पाण्याची गरज असताना शेतातील कामे कमी होत आहेत. परिणामी, शेतीवर मजुरी करणाऱ्या कुटुंबांनाही पुरेसा रोजगार मिळणे कठीण झाले आहे. गावात काम मिळत नसल्याने काही मजूर शहरांकडे रोजगाराच्या शोधात जात आहेत. तर अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी ऊसतोडणीच्या कामासाठी स्थलांतर करावे लागत आहे. गावातील रोजगाराच्या संधी कमी झाल्याने कुटुंबांचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही महत्त्वाचा बनला आहे.
दुष्काळ निवारणासाठी ठोस उपाययोजनांची गरज
एका बाजूला कोरडी नदी, दुसरीकडे टँकरवर अवलंबून असलेला पाणीपुरवठा आणि रोजगारासाठी गाव सोडणारे मजूर, असे रुई परिसरातील दुष्काळाचे चित्र आहे. प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, जनावरांसाठी पाणी व चारा, जलसंधारणाची कामे आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांना प्राधान्य देण्याची गरज आहे.
गेल्या वर्षी पाण्याने तुडुंब भरलेला बंधारा यंदा कोरडा पडला; आता गावात पाण्यासाठी टँकर आणि पोटासाठी रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. मुसाभद्रा नदीची ही अवस्था केवळ पाण्याच्या कमतरतेचे चित्र नसून, दुष्काळामुळे ग्रामीण जीवनासमोर उभ्या राहिलेल्या संकटाची गंभीर जाणीव करून देणारी आहे.