jalna agriculture news
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरातील खरीप हंगामात अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात चारा पीक असलेल्या मका पिकांकडे कल वाढला आहे. त्यामुळे मका पिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. यामुळे मक्याच्या हिरव्या चाऱ्याची कुट्टी साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे चित्र आन्वासह परिसरात दिसून येत आहे.
भोकरदन तालुक्यात अनेक गावात खासगी दूध संकलन संस्था आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून लोक पशुपालन करतात. शेणखत मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे आहेत.
यंदा कमी पावसामुळे चाराटंचाई भासू नये म्हणून शेतकरी पुढाकार घेत चारा पिकांचे नियोजन करत आहेत. या दुधाळ जनावरांना दूधवाढीसाठी मका हिरव्या चाऱ्याची गरज असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून परिसरात अतिवृष्टी होत असल्याने चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी मकाच्या हिरव्या चाऱ्याची कुट्टी करण्यात पसंदी देतात. हवाबंद पन्नी व बॅग साठवण करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. याचा फायद उन्हाळ्यात होत असल्याचे शेतकरी सांगतात.
माझ्याकडे कुट्टी मशीन असून, त्यावर पंधरा लोक काम करतात. एका ट्रॅक्टरची अडीच हजार रुपये ट्रिपप्रमाणे कुट्टी करण्यात येत आहे. त्यात प्रत्येक ट्रिपमागे सोंगणी व कुट्टी करून ती साठवण करण्यासाठी मजुरांना १५०० रुपये, वाहतुकीसाठी ४०० रुपये मिळतात. अर्थात कुट्टी मशीनमुळे रोजगार मिळाला आहे.-अमोल सिरसाठ, कुट्टी मशीन मालक
माझ्याकडे दुधाळ गायी व अन्य जनावरे आहे. त्यांना हिरवा चारा मोठ्या प्रमाणावर लागतो. मात्र, पाऊस गेल्या काही वर्षांपासून कमी किंवा अति प्रमाणात होत असल्याने चारा खराब होत असून लागवड करणे शक्य होत नाही. त्यामुळे एक एकर मकाच्या हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून त्याची साठवणूक करतो.-अजिनाथ सिरसाठ, शेतकरी