Jalna Drought : फुलं ना शेंगा, तूर पिकाच्या झाल्या तूरखाट्या file photo
जालना

Jalna Drought : फुलं ना शेंगा, तूर पिकाच्या झाल्या तूरखाट्या

शेतकऱ्यांवर संकटाचे सावट; मेहनत, खर्च अन् अपेक्षांवर पाणी फिरण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

jalna agriculture bhokardan tur crop drought

आन्वा, पुढारी वृत्तसेवा भोकरदन तालुक्यासह परिसरातील अनेक गावांमध्ये यंदा तूर पिकाची अवस्था चिंताजनक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतात तुरीची झाडे उभी आहेत; मात्र अनेक ठिकाणी झाडांना अपेक्षित प्रमाणात फुले आणि शेंगा लागलेल्या नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. काही शेतांमध्ये तुरीच्या झाडांना फुलांचा अभाव असून, शेंगाही कमी प्रमाणात दिसत असल्याने तुरीच्या पिकाचे अक्षरशः तुरखाट्या झाल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

तूर हे परिसरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने तुरीची पेरणी केली. बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरी आणि मशागतीसाठी मोठा खर्च केला. पिकाची जोमदार वाढ होईल आणि चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या पिकावर फुलधारणा आणि शेंगा लागण्याच्या प्रक्रियेत अपेक्षित वाढ दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तूर पिकाला योग्य वेळी फुले आणि शेंगा लागणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र काही भागांत पिकाची वाढ होऊनही फुलांची संख्या कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही ठिकाणी फुले गळणे, शेंगा कमी लागणे अशा समस्यांमुळे उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यात तूर पिकाची अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. वर्षभराच्या मेहनतीनंतरही हातात अपेक्षित उत्पादन येणार नसेल, तर शेतीचा खर्च कसा भरून काढायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. दुष्काळामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT