जाफराबाद : तालुक्यातील जवखेडा ठेंग परिसरात पाण्याची टंचाई तीव्र होत असल्याने शेतकरी पाण्याचे स्रोत निर्माण करण्यासाठी धडपड करत आहेत. अशातच जवखेडा ठेंग येथील गट क्रमांक २९६ मधील शेतकरी पंतीगराव लहाने यांनी शासकीय अनुदानाची प्रतीक्षा न करता स्वतःच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू केले आहे. पाण्याअभावी शेतीचे नुकसान होऊ नये, या उद्देशाने त्यांनी स्वबळावर हा निर्णय घेतला आहे.
शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असताना विहिरीच्या अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासकीय प्रक्रियेमुळे मदत मिळण्यास विलंब होत असल्याचे लक्षात घेऊन पंतीगराव लहाने यांनी स्वतःच विहिरीच्या खोदकामाला सुरुवात केली. शासनाकडून अनुदान मिळेपर्यंत शक्य होईल तेवढे खोदकाम स्वतःच्या प्रयत्नातून सुरू ठेवणार असून, अनुदान मिळाल्यानंतर पुढील काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोकलेन मशीनद्वारे विहीर खोदण्याला पसंती तालुक्यातील अनेक भागांत शेतकरी विहिरींच्या खोदकामाला प्राधान्य देत आहेत. मजुरांची कमतरता आणि पारंपरिक पद्धतीने विहीर खोदण्यासाठी लागणारा अधिक वेळ यामुळे पोकलेन मशीनद्वारे खोदकाम करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
या यंत्राच्या मदतीने माती, मुरूम आणि खडकाळ भागातील खोदकाम तुलनेने कमी वेळेत करता येते. पारंपरिक पद्धतीने विहीर खोदण्यासाठी काही महिने लागू शकतात; मात्र परिस्थिती आणि जमिनीच्या प्रकारानुसार पोकलेन मशीनच्या साहाय्याने हे काम आठ ते दहा दिवसांतही पूर्ण होऊ शकते.
शासनाच्या मदतीची अपेक्षा
शेतीला पाणी उपलब्ध व्हावे आणि पिके वाचावीत, या अपेक्षेने पंतीगराव लहाने यांनी स्वतः विहीर खोदण्याचे काम सुरू केले आहे. अनुदान मिळण्यास विलंब होत असला तरी हातावर हात धरून बसण्यापेक्षा उपलब्ध साधनांच्या आधारे प्रयत्न सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. शासनाने पात्र शेतकऱ्यांना विहिरींसाठी मंजूर अनुदान वेळेत उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.
मिरची, अद्रक आणि फुलशेतीसाठी पाण्याची गरज
जवखेडा ठेंग परिसरातील अनेक शेतकरी मिरची, अद्रक तसेच फुलशेतीचे उत्पादन घेतात. या पिकांसाठी नियमित पाणीपुरवठा आवश्यक असतो. त्यामुळे शेतकरी विहिरी, कूपनलिका तसेच नदीवरून पाइपलाइन अशा विविध माध्यमांतून पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.