Investigation into the 500-crore clip begins; SIT sends letter to Jarange
अंबड, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी सुरू झाली आहे. या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी नियुक्त एसआयटीने जरांगे पाटील यांना पत्र पाठवले असून संबंधित ऑडिओ क्लिप उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, समितीला आवश्यक असलेली सर्व माहिती आणि पुरावे देण्याची तयारी जरांगे पाटील यांनी दर्शविली आहे.
यासंदर्भात बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, चौकशी समिती जे जे मागेल, ते सर्व आम्ही देऊ. ऑडिओ क्लिपचा स्रोतही तपास यंत्रणेला सांगण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, या क्लिपचा स्रोत असलेल्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
ऑडिओ क्लिप देणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रकार बांधवांसमोर शाश्वती देण्याची मागणी केली. संबंधित व्यक्तीच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही, याची खात्री दिल्यानंतरच ऑडिओ क्लिपचा स्रोत उघड करू, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.
तपास यंत्रणेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
या कथित ऑडिओ क्लिपच्या चौकशीला अधिकृतपणे सुरुवात झाल्याने आता तपास यंत्रणांकडून कोणती माहिती आणि तथ्ये समोर येतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांनी तपास यंत्रणेला सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याने या प्रकरणातील पुढील घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.