Internet, TV cables burden Mahavitaran's electricity poles
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील विविध कॉलनी व गल्लीतील महावितरणच्या वीज खांब व तारांवरून खासगी कंपन्यांचे इंटरनेट वायर व बॉक्स तसेच टीव्ही केबल नेण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे. शहरात राजरोस करण्यात आलेल्या या प्रकारामुळे हे अधिकृत की अनधिकृत हे समजायला मार्ग नाही. दरम्यान विजेच्या खांबावर बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना इंटरनेट व खासगी केबलच्या जाळ्यातून दुरुस्ती करावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
जालना शहरातील महावितरणच्या विज खांबाच्या सहाय्याने विविध इंटरनेट कंपन्याचे केबल व टीव्ही केबलचे जाळे पसरविण्यात आले आहे. शहरात वीज कंपनीच्या खांबाचा सहारा घेउन इंटरनेट व लोकल डिश टी. व्ही. केबल टाकून ग्राहकांना कनेक्शन देण्यात आले आहेत. वास्तविक पाहता वीज वितरण कंपनीचे खांव अनेक ठिकाणी वाकलेले असतांनाच काही ठिकाणी त्या खांबावरील विज ताराही लोबकाळलेल्या आहेत.
अनेकांच्या घरांजवळुन या विज तारा गेल्या आहेत. याच विजेच्या तारा व विज खांबावर विविध खासगी इंटरनेट कंपन्याच्या इंटरनेट केबल वायर व खासगी डिश कंपन्यानी अतिक्रमण केले आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांबाबत प्रचंड जागृक असतांना खासगी इंटरनेट व टीव्ही केबल कंपन्यांनी विज खांबावर अतिक्रमण करुनही कोणतीच कारवाई करतांना दिसत नसल्याने दाल में कुछ काला असल्याची चर्चा आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षापासुन हा प्रकार सुरु असतांनाच एकाही ठिकाणी महावितरणने या विरोधात गुन्हा दाखल केला नसल्याने खासगी कंपनी व महावितरणच्या अधिकाऱ्यांचे असलेले सुमधुर संबध यातुन उघड होतांना दिसत आहे. विविध इंटरनेट कंपन्या महावितरणच्या विजेच्या खांबावर राजरोष स्वताःचे बॉक्स लावत असुन त्यातुन ग्राहकांना इंटरनेट कनेक्शन देउन लाखो रुपये कमाई करतांना दिसत आहे. विज खांबावर विविध जाहीरात बोर्डही झळकत आहेत.
अपघाताचा धोका, तरीही दुर्लक्ष
महावितरणच्या खांबावर खासगी कंपन्याचे इंटरनेट कनेक्शन बॉक्स बसविण्यात आले असतांनाच विजेच्या खांबावरुन ग्राहकाच्या घरापर्यंत इंटरनेट कनेक्शन बसविण्यात आले आहे. महावितरणच्या विज खांबावर फॉल्ट झाल्यास कर्मचाऱ्यांना विजेच्या खांबावर चढतांना व उतरतांना प्रचंड अडचणी येतात. यातुन अपघाताचा धोकाही निर्माण झाला असतांनाही कर्मचारी व अधिकारी काहीच बोलत नसल्याने महावितरणची दादागीरी केवळ विज बील भरणाऱ्या ग्राहकांपुरतीच मर्यादीत असल्याचे पहावयास मिळत आहे.