In one and a half months, 79 people were bitten by dogs
जामखेड, पुढारी वृत्तसेवा :
अंबड तालुक्यातील जामखेड येथे कुत्रा चाव्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक ठरत आहे. दीड महिन्यात जवळपास ७९ जणांना चावा घेतला आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
जामखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंबर महिन्यात ४१ व जानेवारी महिन्यात ३८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. कुत्रा चावल्यास कोणताही विलंब न करता तत्काळ शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घेणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. रेबीज प्रतिबंधासाठी एकूण दहा डोसचे लसीकरण आवश्यक असून, १ आणि - २ प्रकारच्या चाव्यांवरील सर्व लसी जामखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहेत. मात्र३ प्रकारच्या गंभीर चाव्यांमध्ये एक विशिष्ट डोस अंबड ग्रामीण रुग्णालय किंवा जालना येथे घेणे बंधनकारक आहे. हा डोस कुत्रा चावल्यानंतर सात दिवसांच्या आत घेणे आवश्यक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कुत्रा चाव्याची घटना घडताच संबंधित व्यक्तीने तत्काळ आरोग्य केंद्रात नोंद करून संपूर्ण लसीकरण वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. लसीकरणाचा कोर्स अर्धवट सोडल्यास रुग्णाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. रेबीज हा प्राणघातक आजार असून, उपचारात दिरंगाई किंवा निष्काळजीपणा केल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणांनी भटक्या कुत्र्यांबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कुत्रा चावल्यास नागरिकांनी तत्काळ शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत. रेबीज प्रतिबंधासाठी दहा डोसचे लसीकरण पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. १ व २ प्रकारच्या चाव्यांमध्ये सर्व लसी जामखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहेत. ३ प्रकारच्या गंभीर चाव्यांमध्ये एक डोस अंबड ग्रामीण रुग्णालय किंवा जालना येथे सात दिवसांच्या आत घेणे बंधनकारक आहे. उपचारात हलगर्जीपणा केल्यास रेबीजसारखा प्राणघातक आजार होऊ शकतो.-डॉ. पायल राऊत, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र