

जालना : शहरातील जुना जालना भागात गुरुवारी मतदानाच्या दिवशी दुपारी मोकाट कुत्र्याने सुमारे 1.30 वाजेपासून उच्छाद मांडला होता. घायाळनगर परिसरात या कुत्र्याने नागरिकांना चावा घेण्यास सुरुवात केल्यानंतर ते टाऊन हॉल, बाजार गल्ली, आनंदी स्वामी गल्ली, शनिमंदिर मार्गे गांधी चमन ते रेल्वे स्टेशन रोड या परिसरात भटकत राहिले.
या दरम्यान सुमारे 15 ते 16 जणांना त्या कुत्र्याने चावा घेतला. हा आकडा वाढून 30 ते 40 झाला असल्याची माहिती उशिरा समोर आली. यावेळी सर्पमित्र मयुर साबळे यांनी पिसाळलेल्या कुत्रा जात असलेल्या मार्गावरील नागरिकांना सतर्क करीत त्यांना सावध केल्याने कुत्र्याच्या चाव्यापासून अनेक जण वाचले.
जालना शहरात गुरुवारी दुपारी लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी उपचारासाठी येत होते. काही जखमींनी खाजगी रुग्णालयातही उपचार घेतले. सायंकाळपर्यंत रुग्णालयात एकामागोमाग एक जखमी दाखल होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता.
महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या प्रक्रीयेत व्यस्त असल्याने या गंभीर परिस्थितीत उज्ज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक व सर्पमित्र मयुर साबळे यांनी पुढाकार घेत नागरिकांना मोठा दिलासा दिला. दुपारपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांनी कुत्र्यावर लक्ष ठेवत तो ज्या भागात जात असे त्या भागात नागरिकांना सतर्क केले. त्यामुळे पुढील संभाव्य हल्ले टळले आणि अनेकांचे प्राण वाचले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार संबंधित यंत्रणांशी समन्वय साधुन वन विभागाचे अधिकारी घुगे व श्रीमती फुले यांच्याशी संपर्क साधला.
लस उपलब्ध करा
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. विशेषतः बाजारपेठ व दाट वस्तीच्या भागात नागरिक घराबाहेर पडण्यासही घाबरत होते. दरम्यान, मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, जखमींना वेळेवर उपचार व आवश्यक लसी उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.