Jalna News : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज द्या ! file photo
जालना

Jalna News : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज द्या !

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांशी संवेदनशीलतेने वागा; तहसीलदार पागोटे यांचे बँकेला निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Immediately provide new crop loans to farmers who have received a loan waiver!

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळ, पाणीटंचाई आणि घटलेल्या उत्पादनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कर्जासाठी बँकांच्या दारात येणाऱ्या शेतकऱ्यांना नियमांच्या चौकटीत राहून सहकार्य करा, त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागा आणि कर्जमाफी झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार तत्काळ नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्या, असे स्पष्ट निर्देश तहसीलदार रमेश पागोटे यांनी तालुक्यातील बँक व्यवस्थापकांना दिले.

तहसीलदार रमेश पागोटे यांच्या अध्यक्षतेखाली घनसावंगी येथे तालुक्यातील सर्व बँक व्यवस्थापकांची आढावा बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार आणि सहायक निबंधक, सहकारी संस्था, घनसावंगी नवीनकुमार सातपुते यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. पीक कर्ज वाटप, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा, तक्रार निवारण यंत्रणा, सिबिल स्कोअर, बँकांमधील मनुष्यबळाची कमतरता तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन राहिलेले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बँकांनी शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेऊन सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी. कर्जप्रक्रियेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे तहसीलदार पागोटे यांनी सांगितले. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देताना येणाऱ्या अडचणींचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.

कर्जासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद व्यवस्थित ठेवून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वानुसार नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कर्जप्रकरण नाकारले जात असल्यास त्यामागील कारण शेतकऱ्यांना स्पष्टपणे समजावून सांगावे, असेही निर्देश देण्यात आले.

सहायक निबंधक नवीनकुमार सातपुते यांनी पीक कर्ज नाकारले जाण्याची संभाव्य कारणे, कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि अटी याबाबत माहिती देणारे फलक प्रत्येक बँक शाखेत लावण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी आवश्यक बाबींची माहिती मिळून गैरसमज आणि तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, आगामी काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळ निवारण निधी, पीक विमा आणि विविध शासकीय योजनांचे अनुदान जमा होण्याची शक्यता आहे. शासनाकडून मिळणारी ही मदत शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत बँकांनी आवश्यक दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळण्यासाठी बँकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, यावर भर देण्यात आला. बँकांमधील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कार्यालयामार्फत संबंधित बँकांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे मंगेश केदार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध बैठकीतील निर्देशांचाही यावेळी संदर्भ देण्यात आला. जिल्हा प्रशासन, बँका आणि सहकार विभाग यांच्यात समन्वय ठेवून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT