कार-दुचाकी अपघातात दाम्पत्याचा दुर्देवी अंत झाला. Pudhari News Network
जालना

धुळे-सोलापूर महामार्गावर कार-दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार

कारने शंभर फुटापर्यंत स्कुटीसह पती-पत्नीला फरफटत नेले

पुढारी वृत्तसेवा

शहागड : चालकाचे  भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकत समोरुन येणाऱ्या स्कूटीवर आदळली.त्यानंतर कारने स्कुटीसह पत्नी-पत्नीला फरफटत नेले व कार स्कूटीसह नाल्यात पलटी झाली. या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना घटना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील लेंभेवाडी शिवारात रविवारी (दि.७) संध्याकाळी सहा वाजता घडली. 

अॅड.सतिश शाहू मगरे (वय ३३) आणि पत्नी तेजल सतिश मगरे (वय २९, दोघेही रा. पाथरवाला हल्ली मु.पो. अंकुशनगर महाकाळा ता.अंबड) असे अपघातात ठार झालेल्या  पती-पत्नीचे नाव आहे. दरम्यान अपघात घडताच कार चालकाने कार सोडून घटनास्थळावरुन पळ काढला.

याविषयी अधिक माहिती अशी,  सतीश मगरे व्यवसायाने वकील असल्याने ते त्यांच्या पत्नीसह मागील चार महिन्यापासून छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पुतणीचा अंकुशनगर या ठिकाणी साखरपुडा असल्याने दांपत्य साखरपुडाच्या कार्यक्रमाला आले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून रविवारी (दि.७) सायंकाळी सहाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरला दुचाकी स्कुटी ( एम.एच.२१.बी.एन‌.९९२३)वरून निघाले. दरम्यान धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोडपासून काही अंतरावरील लेंभेवाडी शिवारात ते आले असता छत्रपती संभाजीनगरहून भरधाव वेगात येणाऱ्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार (एम एच .४४.एस. ९५६०) ही महामार्गाच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर समोरून येणाऱ्या स्कूटीवर आदळली. यावेळी स्कुटी कारच्याखाली दबली असल्याने त्या कारचालकाने स्कुटीला पती-पत्नीसह शंभर फुटापर्यंत फरफडत नेले व स्कुटीसह कार नाल्यात जाऊन आदळली. या दरम्यान कारखाली चिरडून या दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्या दुचाकीचा पुर्णपणे चक्काचूर होता. तसेच कारचेही मोठे नुकसान झाले होते. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

या अपघाताची माहिती कळताच मृतांच्या नातेवाईकांनी पाचोड ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. नातेवाईकांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. परिसरात या दुर्देवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. उशिरापर्यंत या घटनेची नोंद अंबड पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आलेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT