सुखापुरी: माजी आमदार तथा प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सुखापुरी फाटा येथे २४ जुलै गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. नऊ वाजता सुरू झालेले आंदोलन जवळपास दोन तास चालले. या चक्काजाम आंदोलनामुळे जालना बीड रोडवर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. याप्रसंगी अंबड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सुखापुरी परिसरातील सर्व शेतकरी बांधव महिला,भगिनी, विद्यार्थी वर्ग यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येऊन अंबड तहसीलदारांच्या वतीने मंडळ अधिकारी अश्विनी देशमुख यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले व मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचे आश्वासन दिले. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, अपंगांना वाढीव मानधन देणे, निराधार विधवा महिलांच्या अनुदानात वाढ करणे, जालना जिल्ह्यातील २०२३-२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी अनुदानातील ५०००० च्या वरती राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान अद्यापही जमा झाले नाही ते जमा करणे, शिक्षित,उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरीची हमी द्यावी, रोजगार , उद्योग उपलब्ध करून द्यावा आधी मागण्यासाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
माजी सभापती प्रकाश बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे चक्काजाम आंदोलन केले. चक्काजाम आंदोलन प्रसंगी दिलीपराव हातोटे, अशोक पालकर, शिवाजी खराबे, राम काळे, सुदाम राठोड, ज्ञानेश्वर तारगे, चेअरमन नारायण कणके, अंबादास गोरे, गोवर्धन राजगुरू, सुनील मुसळे, दत्तात्रय साळे, संभाजी डोईफोडे,विठ्ठल साळे, श्याम कुढेकर, दत्तात्रय कसाब ,प्रल्हाद जंगले, हरी कदम, आदीसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.