

नाशिक : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या उपस्थितीत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत. महात्मा जोतिबा फुले जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.११) रात्रीच्या सुमारास हे आंदोलन केले जाणार आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी आमदारांच्या घरांसमोर मशाली पेटवून आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी नुकतेच उपोषण केले होते. त्यावेळी शासनाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केलेल्या वक्तव्यात, 'कर्जमाफी शक्य नाही, ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी,' असे स्पष्टपणे सांगितले. या भूमिकेमुळे प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन होते. तसेच अनेक नेत्यांनीही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रहार संघटनेने राज्यभर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.