Hikmat Udhan Ghansawangi Tehsil Office Pre-Kharif Season 2026 Review Meeting
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना वेळेत व दर्जेदार सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची गैरसोय होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना आमदार हिकमत उढाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
घनसावंगी तहसील कार्यालयात आमदार हिकमत उढाण यांच्या अध्यक्षतेखाली घनसावंगी व अंबड तालुक्याची खरीप हंगामपूर्व सन २०२६ आढावा बैठक उत्साहात व नियोजनबद्ध वातावरणात संपन्न झाली. आगामी खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी सुरळीत, परिणामकारक व अडचणीविरहित पार पडावा यासाठी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत बियाणे व खतांची उपलब्धता, पेरणीपूर्व तयारी, सिंचन व्यवस्थापन, पीकविमा योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, वीजप रवठा, शेतकऱ्यांच्या तक्रारी, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तसेच पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन यासंदर्भात विभागनिहाय माहिती घेण्यात आली. यावेळी आमदार उढाण यांनी कृषी विभाग, महसूल प्रशासन, महावितरण व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश दिले. विशेषतः दर्जेदार बियाणे, पुरेसे खत साठा, सिंचनासाठी आवश्यक वीजप रवठा आणि कृषीविषयक तांत्रिक मार्गदर्शन गावपातळीपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला.
तसेच नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, पाणीटंचाई यांसारख्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना आखण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या व चांगले उत्पादन घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचे आमदार हिकमत उढाण यांनी विशेष स्वागत करून त्यांचे कौतुक केले. अशा शेतकऱ्यांमुळे इतर शेतकऱ्यांनाही नवे मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनाने सतर्क राहून शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर तातडीने कार्यवाही करावी, तसेच योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.