Heavy truck traffic in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील विविध रस्त्यावरून बांधकाम साहित्यासह अवजड वस्तुंची वाहतूक करणारे ट्रक विविध रस्त्यांवरून सुसाट धावताना दिसत आहेत. या ट्रकमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याने दुचाकी चालकांसह छोट्या वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
जालना शहर व्यापारी केंद्र आहे. शहरात विविध व्यावसायिकांचे गोदाम शहरात आहेत. शहरासह जिल्ह्यात होणाऱ्या रेशनच्या अन्नधान्य, वाळू, विटा, सिमेंट, लोखंडी वस्तू, विविध कंपन्याच्या शोरुममध्ये उतरविण्यात येणारी वाहने घेऊन जड वाहने शहरातील विविध रस्त्यांवरून मुक्त संचार करताना दिसत आहेत.
शहरात रेल्वेने येणाऱ्या मालाची वाहतूक करणारे ट्रकही वळण रस्त्याचा वापर न करता डिझेल वाचविण्यासाठी शहरातून धावताना दिसत आहेत. जड वाहतुकीचे ट्रक सुसाट धावणे ही शहरवासीयांसाठी गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः नो एंट्री असतानाही काही भागात ट्रक वेगाने धावताना दिसतात. शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामावर कधी दिवसा तर कधी रात्री अवैध वाळूचे अवजड हायवा चोरीची वाळू घेऊन येतात.
अवजड वाहनचालक वळण रस्त्याचा वापर न करता थेट शहरातून ट्रक घेऊन जातात. अवजड वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे तसेच वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणातही वाढ होताना दिसत आहे. जड वाहतुकीच्या ट्रकमुळे शहरात मोठा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे आणि नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे.
कारवाई करण्याची गरज
शहरातील विविध रस्त्यावरून धावणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे. मोठा अपघात झाल्यांनतर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्यास त्यास अर्थ नाही. शहरात दिवसा प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला गेल्यास जड वाहतुकीला चाप बसणार आहे.