Heavy rainfall grant covers all eight talukas: Arjunrao Khotkar gave information
जालना, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टी अनुदान आणि मदतीपासून वंचित राहिलेल्या जालना जिल्ह्याचाही आता समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आठही तालुक्यातील बाधितांना राज्य सरकारकडून विशेष मदत जाहीर झाली आहे, अशी माहिती आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली.
यासंदर्भात आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, जालना जिल्हा अतिवृष्टीग्रस्त अनुदानापासून वंचित राहिला होता. परंतु जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजित पवार यांच्याकडे मागणी लावून धरली. जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेले आहे. याबाबतचे पंचनामेही झालेले आहेत. असे असतानाही पहिल्या यादीत जालना जिल्ह्याचा समावेश नव्हता. मात्र जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना जिल्ह्यातील शेती आणि एकूण नुकसानीची माहिती देण्यात आली.
प्रशासकीय पातळीवरही प्रत्यक्ष भेटी देऊन पंचनामे करण्यात आले. त्यामुळे जालना जिल्ह्यातील आठही तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. यात जिरायत शेतीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तीन हेक्टर या मर्यादित दिले जाणार आहे. बागायत शेतीसाठी २२५०० तसेच मृत दुधाळ जनावरांसाठी ३७५०० दिले जाणार असल्याची माहीती खोतकर यांनी दिली.
मान्यवरांचे आभार
अतिवृष्टीने जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झालेले असून शासनाने शेतकरी आणि नागरिकांना विशेष पॅकेज जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद दिले पाहिजे असे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी म्हटले आहे.