जालना : जालना शहरातील सराफा बाजारात गेल्या दोन दिवसांत चांदीमध्ये 25 ते 30 हजारांची तर सोन्यात 10 ते 12 हजारांची घसरण झाल्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण दिसून येत आहे.
जालना जिल्ह्यात सोने व चांदीत होणारी गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जात होती.त्यामुळे मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांचा कल सोने व चांदी खरेदी करण्याकडे होता.मात्र डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने,परदेशात क्रिसमसच्या सुट्ट्या, मागणी पेक्षा पुरवठा अधिक या व यासारख्या विविध कारणांमुळे चांदी व सोन्याचे भाव झपाट्याने कोसळल्याचे चित्र आहे.त्यामुळे सलग दोन दिवस सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.
जालना सराफा बाजारात गुरुवारी चांदीचे भाव 2 लाख 35 हजार रुपये किलो तर सोन्याचे भाव 1 लाख 32 हजार रुपये तोळा असे होते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएनशच्या नुसार 30 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,23,293 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. आता हाच भाव बुधवारी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी 1,21,919 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 33 हजार 099 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला. हा भाव मंगळवारी 1लाख 34 हजार 599 रुपयांवर होता. म्हणजेच मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सोन्याचा भाव 1500 रुपयांनी कमी झाले.22 कॅरेट सोन्याचा भाव मंगळवारी 1 लाख 23 हजार 293 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. हाच भाव 31 डिसेंबर रोजी 1 लाख 21 हजार 919 रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजेच हा भाव 1374 रुपयांपर्यंत कमी झाला.
चांदीच्या भावाबद्दल सांगायचे झाल्यास मंगळवारी 2लाख 32 हजार 329 रुपये प्रति किलोवर होता. हाच भाव 31 डिसेंबर रोजी 2लाख 29 हजार 433 रुपयांपर्यंत खाली आला. मंगळवारच्या तुलनेत चांदीचा भाव 2896 रुपयांनी कमी झाला.सोने व चांदीच्या भावातील गुंतवणुक सर्वात सुरक्षित मानली जात असतानाच भावात झालेली घसरण गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण करताना दिसत आहे.
खरेदी कमी ; गुंतवणुकदारांनी हात आखडला
जालना सराफा बाजारात सोने व चांदीच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकी वाढणे अपेक्षित असतानाच उलट चित्र पहावयास मिळत आहे. सोने व चांदीचे भाव कमी होऊनही सोन्या चांदीच्या दुकानातील गर्दी कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे. गुंतवणुकदारांनी सोने व चांदी खरेदीसाठी हात आखडता घेतल्याचे दिसते.