Godavari River Flood : गोदामाय कोपली, नदीकाठची गावं पाण्याखाली; प्रशासन अलर्ट  File Photo
जालना

Godavari River Flood : गोदामाय कोपली, नदीकाठची गावं पाण्याखाली; प्रशासन अलर्ट

१० हजार ग्रामस्थांचे स्थलांतर, पिके बुडाली, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

पुढारी वृत्तसेवा

Godavari River Flood Villages along the river are under water; Administration on alert

जालना, पुढारी वृत्ततसेवा : जायकवाडी धरणातून ३ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला महापूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील सुमारे ३२ गावात पाणी शिरले. लाखो हेक्टरवरील पिकांचे अपरिमीत नुकसान झाले आहे. लेकरांसारखे जपलेले पीक पुरते डुबले. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. महापुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाने पूरग्रस्तभागातील १० हजार ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन अलर्टमोडवर आले असून, बाधित सर्व नागरिकांसाठी निवारा, भोजनासह वैद्यकीय सेवेची सोय शाळा, समाज मंदिर आदी ठिकाणी करण्यात आली आहे.

वडीगोद्री : येथील गोदावरी नदीला पूर आल्याने गोदावरी नदी काठच्या बळेगाव, आपेगाव, साष्टपिंपळगाव, डोमलगाव, गोरी, गंधारी, शहागड, वाळकेश्वर यासह इतर गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळा नातेवाईक, मंगल कार्यालय, अंकुशनगर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल आदी ठिकाणी स्थलांतरित करून त्या ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार विजय चव्हाण यांनी प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन करून अंबड तालुक्यातील गोदाकाठच्या १३ गावातील ९९१ कुटुंब ४३३१ नागरिकांचे व १४८६ जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिली आहे. रविवारी रात्रीतून गोदावरी नदी पात्रात पाणी वाढल्याने आपेगाव येथील श्री विज्ञानेश्वर मंदिराला पाणी लागले आहे.

त्या गावातील श्री विज्ञानेश्वर मंगल कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, तलाठी कार्यालय व शेत शिवारात पाण्यात गेले आहे. याचबरोबर साष्ट पिंपळगाव येथील सव्वाशे वस्तीवरील ५० घरांचे कुटुंब त्या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात आले असून कोणी नातेवाईकांच्या घरी तो कोणी जिल्हा परिषद शाळेत गेले असून काही कुटुंब हे साष्ट पिंपळगाव पैठण रोडवरील रस्त्यालगत आपले जनावरे व घर संसार घेऊन तो रस्त्या लगत थाटला आहे. रोडवरच जनावरांचा गोठा, खोपी करून सव्वाशे वस्तीवरील ग्रामस्थांनी रात्र रस्त्याच्या कडेला काढली आहे. प्रशासनाकडून पूरग्रस्तांना राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्यात आली.

गोंदी गावाला पुराचा वेढा ; ४५० कुटुंबाचे स्थलांतर

गोदावरी नदीला पूर आल्याने गोंदी गावाला पुराचा वेढा पडला आहे. गावातील जिल्हा परिषद कन्या शाळा, गोंदेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिर पूर्णतः पाण्यात गेले असून गावातील अनेक घरात पाणी शिरले आहे. त्या ठिकाणच्या ४५० कुटुंबांचे जिल्हा परिषद शाळा खाजगी शाळा वैतागवाडी अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT