

Corporation's commitment to the health of construction workers
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून मोठा दिलासा देण्याचे काम होत आहे. नोंदीत कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देणाऱ्या ३५ पेक्षा अधिक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळाकडूणन सुमारे २ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उलब्ध होणार आहे. याचा लाभ२,३४,६५० कामगार व त्यांच्या कुटुंबांना मिळणार आहे.
मंडळाने कामगारांसाठी आरोग्य सुविधा तत्काळ व सुलभ मिळाव्यात म्हणून अनेक सरकारी व खासगी रुग्णालयांशी करार केले आहेत. कामगारांनी आधार कार्ड, नोंदणी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह रुग्णालयात दाखल होताच उपचार सुरू होतात. यामुळे कामगार कुटुंबांना दिलासा मिळतो आणि आर्थिक तंगी कमी होते.
या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यालयीन प्रमुख अ. मा. जाधव यांच्यावतीने करण्यात आले आहे. या मुख्य कल्याणकारी योजनेत आरोग्य सेवा व शस्त्रक्रिया, शिक्षण सहाय्य, अपंगत्व व अपघात विमा, मातृत्व लाभ, निवृत्तिवेतन, गृहबांधणी सहाय्य, प्रवास भत्ता, मुलींचे लग्न अनुदान, मृत्यू नोंदणी व अंतिम संस्कार भत्ता आदी सुविधा मिळणार आहेत. नोंदणीकृत कामगार, त्यांची पत्नी व १८ वर्षांखालील दोन अपत्यांसाठी वार्षिक २ लाख रुपयांपर्यंत कोणत्याही आजारांसाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी मोफत सुविधा उपलब्ध आहे. यात सर्वसामान्य आजारांपासून ते मोठ्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना गंभीर आजार आणि प्रसूतीसाठी आर्थिक मदतीचा महत्त्वपूर्ण लाभ दिला जातो. यात महिला कामगारांना प्रसूतीच्या वेळेस आर्थिक मदत दिली जाते. नोंदणीकृत कामगारांना कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही योजना कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.