घनसावंगी : मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसानंतर घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मका, मूग, आदी पिकांची पेरणी पूर्ण केली. पावसानंतर काही दिवसांतच शेतामध्ये हिरवेगार अंकुर डोलू लागल्याने यंदाच्या हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सध्या तालुक्यात कडक ऊन पडत असून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. अनेक ठिकाणी उगवलेले कोवळे अंकुर पाण्याअभावी कोमेजू लागले असून पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होत आहे.
सुरुवातीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना वेळेवर पाऊस न मिळाल्यास त्यांची वाढ खुंटण्याची भीती कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. तालुक्यात बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाचा खंड पडला की त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
अनेक शेतकरी सकाळ-संध्याकाळ शेतात जाऊन पिकांची पाहणी करत असून आकाशाकडे आशेने नजर लावून बसले आहेत. कापूस आणि सोयाबीन या पिकांना सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात पुरेसा ओलावा मिळणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, सध्या पडत असलेल्या उष्णतेमुळे जमिनीला तडे जाऊ लागले असून अंकुरांची मुळेही कोरडी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अशीच परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास अनेक ठिकाणी पुन्हा पेरणी करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची शक्यता वर्तविली जात असली तरी प्रत्यक्षात अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही.
परिणामी खरीप हंगामाची सुरुवातच संकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे. बियाणे, खत, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहील.
उगवलेली हिरवीगार पिके पाहून यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने आणि उन्हाचा तडाखा वाढल्याने पिकांवर ताण येऊ लागला आहे. जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत असून कोवळी रोपे सुकण्याच्या मार्गावर आहेत. आता वेळेत पाऊस झाला तरच पिकांना जीवदान मिळेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळू शकेल."प्रवीण धांडगे, शेतकरी, राहेरा
सुरुवातीला झालेल्या पावसामुळे चांगला उत्साह निर्माण झाला होता. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाची वेळेत पेरणी केली. पिकेही जोमाने उगवली; मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. कडक उन्हामुळे कोवळे अंकुर कोमेजू लागले असून पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे.विठ्ठलराव अरगडे, शेतकरी, बोंधलापुरी