Ganesh Chaturthi : Gourai will arrive today
जालना, पुढारी वृत्तसेवा जालना शहरासह जिल्ह्यात रविवारी घरा-घरात गौराईचे आगमन होणार आहे. गौराई पूजन अर्थात महालक्ष्मीच्या मंगलमय उत्सवाला रविवारपासून सुरुवात होत आहे. सासरी गेलेली गौराई माहेरी परतते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे गौराईच्या आगमनाचा उत्सव हर्षोल्हासात सर्वत्र साजरा केला जातो. तीन दिवस माहेरी येणाऱ्या गौराईच्या स्वागताची घरा-घरात जय्यत तयारी करण्यात येत आहे.
जालना शहरातील बाजारात गौरींकरिता मुखवटे, पाऊले, बाळ याशिवाय लक्ष्मीच्या साजाची खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पितळाचे तर काही ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे असलेल्या गौरींची स्थापना केली जाते. ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा आली, सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली, असे म्हणून आणि उखाणे घेत ज्येष्ठा कनिष्ठांचे हळदी-कुंकू लावून, वाजत गाजत सुवासिनी रविवारी स्वागत करणार आहेत.
गौरीचे मुखवटे, दागिने व इतर सजावटीच्या साहित्यांनी शनिवारी बाजार सजला होता. बाजारात महालक्ष्मीसाठी कपडा बाजारात विविध रंगातील आकर्षक साड्या विक्रीसाठी आल्या आहेत. पूर्वी महालक्ष्मी बसवणे हा फार किचकट प्रकार म्हटला जायचा. मात्र आता त्यात सुधारणा होऊन कमी वेळ लागणारे व आकर्षक महालक्ष्मी मूर्ती तथा मुखवटे बाजारात आले आहेत. कापडाचे हात यासाठी कापसाचे हात हा चांगला पर्याय पुढे आला आहे. तसेच विविध मुखवटेसुध्दा बाजारात उपलब्ध झालेले आहेत. तयार मुखवटे घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाजारात लोखंडी मखर व त्यावर कापडी सजावट केलेली मखर असे दोन प्रकार विक्रीसाठी आले आहेत.
गौरींना साडी नेसविण्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र आता शिवून मिळणाऱ्या तयार (रेडिमेड) साडी, नउवारी घेण्याकडे महिलांचा कल वाढत आहेत. लाल, गुलाबी, हिरवा, जांभळा असा गर्द रंगातील साड्या व नउवारीला पसंती दिली जात आहे.
गौरीसाठी नानाविध दागिन्यांची मोठी रेंज बाजारात आली आहे. यात मोत्यांचे, डायमंड, गोल्डन, सिल्व्हर असे दागिने बाजारात आलेले आहेत. हार कानातले, बिंदी, बांगड्या, बाजुबंद, कमरपट्टा, हल्ला, लक्ष्मीहार, मंगळसूत्र, एकदानी, राणीहार, कुंदनहार, तोरड्या, विच्छवे असे अनेक दागिने आहेत. विविध आकारातील व डिझाईन मुकुट देखील उपलब्ध आहेत. शिवाय कलात्मक केसांचा विग व इतर साहित्यही आहेत.
ज्येष्ठा-कनिष्ठांचे आगमन झाल्यानंतर पाहुणचारामध्ये १६ भाज्यांना एकत्रित करून एक भाजी करण्याची पद्धत आहे. याकरता बाजारांमध्ये भेंडी, गिलके, तोडली, कोबी, गवार, कटुले यासारख्या भाज्या विक्रीसाठी आल्या आहेत. सोबतच आंबिलच्या प्रसादाचादेखील पंचपक्वान्नांमध्ये समावेश असतो. याशिवाय करंजी, पुऱ्या, लाडूचा फराळदेखील तयार झाला असून गौरी पूजनाप्रसंगी फुलोरा लावण्यात येतो. तर पुरणाच्या पोळीचा मुख्य नैवेद्य या वेळी गौरीला दिला जातो.