

CEO Minnu P. M.: Artificial Intelligence Training for District Administration Employees
जालना, पुढारी वृत्तसेवा : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर काळाची गरज आहे. सर्वांनी त्याचा वापर करून आपल्या कामातील गती वाढवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी केले.
गुरुवार दि. २८ रोजी येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी एम. के. सी. एल.च्या वतीने आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रशिक्षणात त्या बोलत होत्या. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लिंबाजी बारगिरे, कार्यकारी अधिकारी (बांधकाम) सविता सलगर, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांची या वेळी उपस्थिती होती.
दिवसेंदिवस तंत्रज्ञानात नवनवीन बदल होत आहे. सद्यस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वत्र केला जात आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाज करतेवेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय.) वापर करावा, या साठी एमकेसीएलच्या वतीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. एमकेसीएलचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी ए. आय. आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनात प्रभावी वापर या विषयी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर प्रशिक्षण दिले.
निर्मितीक्षम, संवाद क्षम, भविष्यवाणी करणारे, ओळख करणारे, सायबर सुरक्षेसाठी उपयुक्त असणारे इत्यादी एआय बाबत तसेच अनिमेशन, ऑडिओ, ग्राफिक्स, व्हिडीओ, परिच्छेद, चित्र या माध्यमातून आपल्या कामाची गती कशी वाढवावी या विषयी प्रशिक्षणात माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर जिल्हा परिषदेच्या कामकाजात केल्यास गती आणि पारदर्शकता वाढू शकते. विविध विभागांतील नोंदी, कागदपत्रे व अर्जाचे डिजिटल विश्लेषण एआयच्या मदतीने जलद करता येईल. पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास अशा क्षेत्रातील माहितीचे संकलन व नियोजन अचूक पद्धतीने होईल. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, निधीचा कार्यक्षम वापर व कामांचे ऑनलाईन निरीक्षण या सर्वांत एआय उपयुक्त ठरेल. यामुळे वेळेची बचत होऊन निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता व वेग येईल.