Jalna Rain : सर्वदूर पावसाने शेतकरी सुखावला, पिकांना जीवदान File Photo
जालना

Jalna Rain : सर्वदूर पावसाने शेतकरी सुखावला, पिकांना जीवदान

घनसावंगी तालुक्यासह आष्टीत अतिवृष्टी, नद्यांना आले मोठे पूर

पुढारी वृत्तसेवा

Farmers were happy with rain everywhere, life was given to crops

जालना, पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे बुधवारी रात्री आगमन झाले. जिल्ह्यात सर्वदूर पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. घनसावंगी तालुक्यात चोवीस तासांत अतिवृष्टीची नोंद झाली असून तालुक्यात तब्बल ८९.७० मि.मी. पाऊस पडला आहे. परतूर तालुक्यातील आष्टी येथे गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ९६ मि.मी. तर सातोना येथे ७९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात १ जून ते १७ जुलैपर्यंत ३२२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ३० टक्के आहे.

जालना जिल्ह्यात ६ लाख ५१ हजार हेक्टरवर खरिपाचे क्षेत्र असून जवळपास ६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. जून महिन्यात जोरदार पाऊस पडण्याच्या अंदाजावरून शेतकऱ्यांनी झटपट खरिपाची पेरणी केली. मात्र पेरणीनंतर पाऊस न पडल्याने कोवळी पिके माना टाकू लागली होती.

अधूनमधून पडणाऱ्या हलक्या पावसावर पिके कशी बशी तग धरून होती. खरिपाचे पीक धोक्यात आले असतानाच बुधवारी पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २७मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पडलेला पाऊस, कंसात चोवीस तासांत पडलेला पाउना असा जालना १८८(१३.८०), बदनापुर (१४.२०) २०२.३०, भोकरदन (३.१०) २१६.१०, जाफराबाद (००) २३४.९०, परतूर (५७.८०) १४४.६०, मंठा (४.९०) १३५.१०, अंबड (३४.५०)१४८.१०, बनसावंगी (८९.७०) १८०.२० मि.मी. पाऊस पडला आहे.

घनसावंगी तालुक्यात चोवीस तासांत ८९ मि.मी. पावसाची नोंद

घनसावंगी तालुक्यात बुधवार (१६) रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसासह अतिवृष्टी झाली. तालुक्यात चोवीस तासांत तब्बल ८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे टेंभी आंतरवाली येथील नारोळा नदीला पूर आला. या पावसामुळे अनेक शेतातील माती खरवडून वाहून गेली असली तरी खरीप पिकांना पावसाने जिवनदान दिले आहे.

तालुक्यातील महसूल मंडळात मागील चोवीस तासांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या या मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यातील बोडखा येथून टेभी आंतरवालीकडे वाहणाऱ्या नारोळा नदीला पूर आला. या पावसामुळे खरीपाच्या पिकांना संजीवनी मिळणार आहे. जोरदार पावसामुळे बानेगाव, शिंदे वडगाव, बोलेगाव, बोडखा परिसरातील कपाशीचे नुकसान झाले.

घनसावंगी तालुक्यात ८५ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. बुधवारी अचानक बातावरणात बदल होऊन मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दीड महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीने पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. मात्र काही ठिकाणी पडलेल्या जास्तीच्या पावसाने शेतात उभे असणारे पिके जमिनीसकट बाहुन गेल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घनसावंगी तालुक्यात यावर्षी मे महिन्यानंतर जूनमध्ये दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी ८५ टक्के पेरण्या उरकल्या, मात्र नंतर पाऊसच पडला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना दद्वार पेरणी करावी लागली. सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने पिकांची वाढ खुंटली होती. मात्र रात्रीच्या पावसाने नदी-नाले भरभरून वाहल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जाफराबाद तालुका कोरडा

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुका वगळता सात तालुक्यांत पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट दूर होणार आहे. आगामी काही दिवसांत जिल्ह्यात मोठ्या पावसाची गरज आहे.

नदी ओढे भरून वाहिले

घनसावंगी तालुक्यात बुधवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, ओढे दुथडी भरून वाहताना दिसून आले. या पावसामुळे आगामी काही दिवसांत विहिरीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ होणार आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT