शहागड : अबंड तालुक्यातील गोंदी येथे मंगळवार (दि.17) रोजी सकाळी गोंदेश्वर मंदिराच्या पाठीमागील गोदावरी नदी पात्रात शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनी विरोधात विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन केले.यावेळी कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी शेतकऱ्यांनी 2025 चा खरीप पीकविमा तत्काळ देण्यात यावा, मागील वर्षी 2025 मध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन कापूस, सोयाबीन, तूर, फळबाग मोसंबी, डाळिंब, भाजीपाला शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला माल अतिवृष्टीमुळे मातीमोल झाला होता. अद्यापही पीकविमा कंपन्याने 2025 चा पीकविमा दिला नसल्याने गोंदी भागातील संतप्त शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचे हत्यार उपसले.
यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणीही केली. मागील वर्षी याच मागणीसाठी त्यांनी आमरण व उपोषण जलसमाधी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना प्रशासनाने आश्वासन दिले होते.त्या आश्वासनाची त्यांनी अद्यापही पूर्तता केली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिलेली असून, यामुळे प्रशासन व शासनाविरुद्ध आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये उड्या घेतल्या. यावेळी पीकविमा आमच्या हक्काचा यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
जून महिन्यात खरीप हंगाम चालू होत असून यात अतिवृष्टीचा पीकविम्याची भरपाई रक्कम देण्यात आल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर लावण्यासाठी हातात पैसे येतील अशी शेतकऱ्यांची आशा आहे. महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यानेही शेतकऱ्यांचा प्रशासनाविरुद्ध आक्रोश आहे. यावेळी गोंदी पोलिसांनी गोदावरी नदी पात्राजवळ कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आमरण उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. यावेळी गोंदी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी बांध शेतकरी विविध शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक संतोष मुपडे, गोपीने शाखेचे जमादार चरणसिंग बामणवात, दीपक भोजने, पो.का.शाकेर सिद्दीकी, गृह रक्षक दलाचे जवान नारायणकर, बंदोबसासाठी तैनात होते. गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत. जलसमाधी आंदोलनासाठी गोदावरीमध्ये उड्या घेतल्या होत्या. त्यांच्या हातात विविध मागण्यांचे बॅनर होते.