

खुलताबाद : ईद-उल-फित्रचा सण जवळ आला आहे. शहर व जिल्ह्याभरात हा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, सणाच्या काळात नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी खुलताबाद येथील एका शिष्टमंडळाने जिल्ह्याच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने ईद-उल-फित्रच्या काळात शहरात मुबलक पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, सर्वत्र स्वच्छता राखणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले.
विशेषतः खुलताबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने विविध विभागांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या मागण्यांची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या शिष्टमंडळात दर्गा कमिटी हद्दे कलांचे अध्यक्ष एजाज अहमद, दर्गा कमिटी हद्दे खुर्दचे अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी, माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन, मोहम्मद मतीन जागीरदार आदिंचा समावेश होता. सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.