Farmers' crops and hard work washed away in heavy rains
शहापुर, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडाळात झालेल्या ढगफुटीसदृश पडत असलेल्या पावसामुळे महसूल मंडळातील सर्वच नदी नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. परी-सरातील अनेक नद्यांना पूर आला असून ओढे नाले भरून वाहत आहेत. नदी, नाला व ओढ्याच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी पिकांबरोबर शेतातील माती देखील वाहून गेली आहे. मठतांडा येथील शेतकऱ्याच्या शेतात ओढ्याचे पाणी शिरल्याने दोन एकर वरील कपाशी भुईसपाट झाली आहे. पुराच्या पाण्याने शेतातील माती देखील वाहुन गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.
अंबड तालुक्यातील मठ तांडा येथील शेतकरी सुभाष गोवर्धन राठोड यांची दाढेगाव शिवारात गट नं ८१ मध्ये ६० आर जमीन आहे. गतवर्षी त्यांनी दोन एकर वर कपाशीची लागवड केली होती. परंतु हाता तोंडाशी आलेले कपाशीचे पीक सततच्या अतिवृष्टी मूळे जमीनदोस्त झाले आहे. पिकांबरोबर शेतातील माती देखील वाहून गेली आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यां समोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू आहेत.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती पुरांच्या पाण्यामुळे वाहून गेली, त्यांचे पंचनामे प्रथम करण्याचे आदेश असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. या विषयी दाढेगावा सजाचे तलाठी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.