

शरद मुळे
सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी महसुली मंडळावर अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे, अद्याप अतिवृष्टी थांबण्याचे नाव घेत नाही. सलग पाचव्यांदा झालेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी (दि.२७) रात्री तब्बल ६५ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे परिसरातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर शेतकऱ्यांचे कापसाचे बोंड संडून काळवंडले असून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
परिसरातील रस्त्यांची अक्षरशः दुरदश्या झाली आहे. मुख्य मार्गांवर पाणी साचल्याने वाहनांची ये-जा ठप्प झाली असून बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामीण भागातील लोकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
शेतकरी मोठ्या चिंतेत असून त्यांनी प्रशासनाकडे तातडीने 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी केली आहे. सलग पावसामुळे जमिनीत पाणी साचून शेती कामे ठप्प झाली आहेत. कापूस, सोयाबीन, तुर या पिकांना मोठा फटका बसला आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत असून शासनाने त्वरीत पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. पावसाचा अनियंत्रित तडाखा पाहता सुखापुरी मंडळ ओल्या दुष्काळाच्या छायेत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.