Even after heavy rains, Panchnamas remain incomplete, administration is evasive
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यात सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः हवालदिल झाला. अनेक गावांतील शेती खरडून गेली, पिके वाहून गेली, विहिरींमध्ये गाळ साचला, जनावरांच्या गोठ्यांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले. काही गावांमध्ये तर घरांच्या भिंती कोसळल्या, पत्र्याचे शेड उडाले, आणि पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र या सर्व नुकसानीनंतर जवळपास दोन महिने उलटूनही पंचनामे पूर्ण न झाल्याने शेतकरी आणि नागरिक आजही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी आदेश जारी करून संबंधित महसूल व पंचायत राज विभागातील अधिकाऱ्यांना शेती, विहिरी, घरांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून दिवाळीपूर्वीच अनुदान वाटप पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर गटविकास अधिकारी, पंचायत समिती घनसावंगी यांनी दिनांक १० ऑक्टोबर रोजी घर पडझड व घरात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी स्वतंत्र पथके नेमली होती. परंतु, प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये पंचनामे अपूर्णच राहिले आहेत. काही ठिकाणी अधिकारी फक्त प्राथमिक नोंदी करून गेले, परंतु प्रत्यक्ष स्थळ पाहणी केलीच नाही.
यावर युवा शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य रामप्रसाद माणिकराव खरात यांनी तहसीलदार, घनसावंगी यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने पंचनामे पूर्ण करून मदत वितरित करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून निधी वितरित करावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील," असा इशाराही खरात यांनी दिला.
प्रशासनात समन्वयाचा अभाव
अनेक शेतकरी आणि नागरिकांना अजूनही नुकसान भरपाईची वाट पाहत आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने शेतातील गाळ काढून शेती पुन्हा तयार केली, परंतु त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांनाही अद्याप आर्थिक साहाय्य मिळालेले नाही. प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून येतो.