Doors to self-employment open; 137 loan proposals approved
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरी तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक-युवतींना उद्योग, व्यवसाय आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला (सीएमईजीपी) जालना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत १३७ कर्ज प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिली आहे.
जिल्ह्यासाठी यावर्षी ७८० कर्ज मंजुरी प्रस्तावांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ५६९ प्रस्ताव बँकांकडे शिफारस करण्यात आले असून, त्यातील १११ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. तसेच जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत २४७प्रस्तावांची शिफारस करण्यात आली त्यापैकी २६ प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिली आहे.
बँकांकडूनही अपेक्षित सहकार्य मिळत असल्याने जिल्हाभरात तरुणांचे स्वयंरोजगाराचे स्वप्न साकार होत असल्याचे दिसून येत आहे. स्वयंरोजगार उभारून इतरांच्याही हाताला काम देता यावे आणि आपलाही उदरनिर्वाह व्हावा, यासाठी तरुणांकडून वेगवेगळे उद्योगांची उभारणी करण्यात येत आहे.
दरम्यान, सन २०२६-२७ साठी जिल्ह्यात १३०० प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या कर्ज प्रस्तावांना बँकांनी तातडीने मंजुरी देऊन उद्दिष्टपूर्तीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
१३०० प्रकरणे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक-युवतींना उद्योग व स्वयंरोजगारासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. इच्छुकांनी योजनेच्या www.maha-cmegp.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.- योगेश.रा. सारणीकर, उपआयुक्त, जिल्हा उद्योग केंद्र, जालना