Donation of ₹11.5 lakh offered at the feet of Rajureshwar Ganpati
जालना, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील राजूर येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री गणपती संस्थान येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त शुक्रवारी (३ जुलै) भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत देणगी अर्पण केली. या वेळी राजुरेश्वर गणपतीच्या चरणी विविध माध्यमांतून ११ लाख ४० हजार ७६१ रुपये इतकी देणगी प्राप्त झाली.
संस्थानाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, थेट देणगी स्वरूपात २ लाख २२ हजार १११ रुपये जमा झाले. यात श्री गणपती देणगी १ लाख ४१ हजार ८०० रुपये, अभिषेक देणगी ४३ हजार २६ रुपये, बांधकाम देणगी २७हजार ७२ रुपये, सुबक मार्बल आसनासाठी ५ हजार ५११ रुपये आणि अन्नदानासाठी ४ हजार ७०२ रुपये, श्री गणपती दानपेटीतून ५ लाख ७६ हजार ५५० रुपये आणि बांधकाम दानपेटीतून ३ लाख ४२ हजार रुपये अशी ९ लाख १८ हजार रुपये प्राप्त झाले.
भक्तिमय वातावरण
संकष्टी चतुर्थीनिमित्त राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी राजुरेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन नवस फेडले. भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संस्थान परिसर दिवसभर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.