

Donation of ₹14.5 lakh to Rajureshwar
जालना, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील राजूर येथील राजुरेश्वर गणपतीच्या चरणी भाविकांनी संकष्टी चतुर्थीनिमित्त १४ लाख ४० हजार १९१ रुपयांची देणगी अर्पण केली.
भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध राजूर येथील श्री राजुरेश्वर गणपती मंदिरात बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. जालना जिल्ह्यासह बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हजारो भाविकांनी राजूर येथे येऊन गणरायाचे दर्शन घेतले. दिवसभर मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीन फुलून गेला होता.
संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी श्री गणेशाला नारळ, फुले, हार, दुर्वा तसेच विविध प्रकारचा प्रसाद अर्पण केला. यामुळे मंदिर परिसरातील फुले, पाने, प्रसाद आणि पूजासाहित्य विक्रेत्यांची मोठी उलाढाल झाली. स्थानिक व्यापाऱ्यांनाही या धार्मिक सोहळ्याचा आर्थिक लाभ झाला.
मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांकडून देणगीपेटी, ऑनलाइन देणगी तसेच इतर माध्यमांतून एकूण १४ लाख ४० हजार रुपयांची देणगी प्राप्त झाली.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन जालना बस आगारासह इतर आगारांच्या वतीने राजूरसाठी जादा बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना प्रवासाची सुविधा मिळाली. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली होती. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हजारो भक्तांच्या उपस्थितीत राजूर गणपती मंदिरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुख, समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली.
श्री राजुरेश्वरास मिळालेली देणगी
श्री गणपती संस्थान देणगी २ लाखा हजार ६००, अभिषेक देणगी ४१ हजार ९१५, बांधकाम देणगी २२ हजार ८१२, सुबक मार्बल आसन देणगी २९ हजार ५५९, श्री दानपेटी ६८ हजार ९५५, बांधकाम दानपेटी ४ लाख २२ हजार ३५० असे एकूण १ लाख ४४ हजार १९१ रुपये प्राप्त झाले.