आन्वा ः ऐककाळी डिजिटल पेमेंट म्हणजे केवळ मोठे मॉल्स किंवा आलिशान शोरूमपुरते मर्यादित होते. मात्र आता ही संकल्पना पूर्णपणे बदलली असून किरकोळ बाजारपेठेनेही डिजिटल व्यवहारांचा स्वीकार केला आहे.
कडक उन्हात फळे विकणाऱ्या हातगाडीवाल्यापासून ते चहा विक्रेत्यांपर्यंत प्रत्येकाच्या दुकानात दिसणारा निळ्या-पांढऱ्या रंगाचा क्यूआर कोड नव्या आर्थिक बदलाची साक्ष देत आहे. यूपीआयमुळे रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी होत असून अर्थव्यवस्था अधिक स्मार्ट बनत आहे.
रोख रक्कम हाताळण्याची जोखीम कमी झाल्याने लहान व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजी मंडईतील विक्रेते, फळविक्रेते तसेच छोट्या वस्तू विकणाऱ्यांनीही या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला आहे. यामुळे सुट्या पैशांचा प्रश्न तर मिटलाच, शिवाय दररोजची चिल्लर साठवणे आणि ती बँकेत जमा करण्याची कटकटही संपली आहे.
काही वर्षांपूर्वी बाजारात खरेदीसाठी बाहेर पडताना खिशात पुरेशी रोख रक्कम आहे की नाही, याची खात्री करावी लागत होती. मात्र आज परिस्थिती बदलली असून मोठ्या शोरूमपासून ते फुटपाथवरील विक्रेत्यांपर्यंत सर्वत्र क्यूआर कोडद्वारे पेमेंट स्वीकारले जात आहे. कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स शोरूम आणि सोन्याच्या बाजारातही मोठे व्यवहार डिजिटल पद्धतीने होत आहेत.
या बदलाचा सर्वाधिक फायदा लहान विक्रेत्यांना झाला आहे. अगदी एक रुपयापासूनचे व्यवहारही आता डिजिटल होत असल्याने “सुटे पैसे नाहीत” हा वाद जवळपास संपुष्टात आला आहे. प्रत्येक व्यवहाराची नोंद मोबाइलवर होत असल्याने हिशेब ठेवणे सोपे झाले आहे.
फायदेशीर
ऑनलाइन पेमेंटमुळे बँकेत जाण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे चांगला फायदा झाला, अनेकवेळा ग्राहकांजवळ सुटे पैसे नसतात. तेव्हा ऑनलाईन व्यवहार प्रत्येकांसाठी फायदेशीर ठरत आहे.