Devotees queue for darshan of Rajureshwar
राजूर/भोकरदन पुढारी वृत्तसेवा : अंगारिका चतुर्थी निमित्त जिल्ह्याचे दैवत श्री क्षेत्र राजूर येथील राजुरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांची सोमवारी (दि.११) सायंकाळपासून राजूर नगरीकडे रीघ लागली होती. ठिक-ठिकाणी भाविकांना फराळ, चहाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासनाकडून तयारी पुर्ण करण्यात आली असून पोलिसाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गणपती महाराज की, जय' 'पुढे चलारे पूढे चला राजुरेश्वर की, जय बोला' अशा गगनभेदी घोषणा देत भावीकांचे जथ्थे सोमवारच्या रात्री राजुरेश्वराच्या दर्शनासाठी राजुरात दाखल झाले होते. अंगारकी चतुर्थीला पायी येणाऱ्या भावीकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. अंगारकेला लाखो भावीक आनवाणी पायाने पायी येऊन नवस बोलतात. जालना, भोकरदन, देऊळगाव राजा, फुलंब्री अशा प्रमुख महामागॉवरून पायी येणाऱ्या भावीकांची संख्या मोठी आहे. जालना व भोकरदन महामार्ग गर्दी फुलून गेला होता.
अंगारकी चतुर्थी निमित्त प्रशासनाने या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला असून दर्शन रांग, मंदिराच्या चारही बाजूंना पार्किंग व्यवस्था व इतर सोयी सुविधांसाठी गेल्या आठ ते दहा दिवसापासून प्रशासन व्यस्त असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजुर नगरी कडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पायी येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी चहापाणी तसेच फराळाची व्यवस्था त्याचप्रमाणे तोंड धुण्यासाठी अंघोळी साठी गरम पाणी इत्यादी व्यवस्था विविध सामाजिक संस्था, मित्रमंडळे, तसेच या मार्गावरील गावकरी यांच्याकडून करण्यात आलेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त राजूर नगरीत दाखल होण्यास सुरुवात झाली होती त्यामुळे संपूर्ण राजूर नगरी गणेश भक्तांनी फुलून गेली होती. राजुर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
अंगारिका चतुर्थीनिमित्त राजुरेश्वराच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची संपूर्ण दक्षता प्रशासनाने घेतली असून गेल्या अनेक दिवसापासून यासाठी प्रशासन व राजूर संस्थान झटत आहे.प्रशांत दानवे, प्रशासकीय अधिकारी, गणपती संस्था राजूर