Delay in salary of Z.P. teachers
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन मागील काही महिन्यापासून प्रत्येक महिन्यात उशिराने होत असल्याने या वेतन दिरंगाई प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
शिक्षकांच्या वेतनास सातत्याने दिरंगाई होत असल्यामुळे प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यापवतीने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्याकडे सीएमपी प्रणालीने वेतन करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणी प्रमाणे शिक्षक वेतन दिरंगाई वर जालना जिल्हा परिषदेव्दारे जिल्हयात सीएमपी सारखा पथदर्शी उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.
शिक्षकांचे वेतन साधारण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५ ते ६ तारखेपर्यंत करण्याचे उद्दिष्ट या वेतन प्रणालीने साध्य केले होते. हा यशस्वी प्रयोग राबवून जालना जिल्ह्याने राज्याचे लक्ष्य वेधले होते. या प्रणालीची यशस्वीता पाहून शिक्षण आयुक्तांनी हा पथदर्शी उपक्रम सर्व राज्यांमध्ये राबवून शिक्षकांचे वेतन ५ तारखेपर्यंत करण्याबाबत यशस्वी कार्यवाही सुरू केली होती. मात्र ज्या जिल्ह्याने हा उपक्रम राज्याला दिला त्या जिल्ह्याचे वेतन आता दरमहा पंधरा तारखेच्या आसपास होत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शिक्षकांच्या दरमहा वेतन दिरंगाईमुळे प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन शिक्षकांच्या वेतन दिरंगाई प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून वेतन दिरंगाई टाळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन संघटनेला दिले आहे. प्रहार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय हेरकर, जिल्हाध्यक्ष मुकुंद खरात यासह जिल्हा उपाध्यक्ष संदीप सोळके, राजेंद्र लबासे, सुरेश धानुरे, सोननाथ बडे, शिवाजी अडसूळे, गजानन सरकटे, संजय पाठक, दिलीप पराड, अभिजीत बंगाळे, मुकेश गाडेकर, अशोक ढेरे, राजकुमार सुरडकर उपस्थित होते.
शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला अदा करण्याबाबत शासनाचे स्पष्ट आदेश असूनही वेतनास दरमहा दिरंगाई होत आहे. परिणामी जिल्ह्यातील शिक्षकांना साधारण ४० लाखापर्यंत भुर्दंड सहन करावा लागत आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षक वेतन संदर्भात लक्ष घालावे अशी विनंती संघटनेने केली आहे.मुकुंद खरात, जिल्हाध्यक्ष