भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील हसनाबाद येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पीव कर्जाचे वाटप अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तत्काळ पीक कर्ज वाटप सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी दिला आहे. उपशाखाधिकारी सचिन कांबळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या शाखेत 22 गावे आहेत. आतापर्यंत अडीच हजार फाइल जमा झालेल्या आहेत. आजपर्यत केवळ 30 कर्ज प्रकरणे निकाली निघालेले आहे. अनेक शेतकरी पीक कर्ज मिळविण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र सातबारा उताऱ्यावरील इतर बँकांचे बोजे, सिव्हिल रिपोर्टच्या नावाखाली लावण्यात येणाऱ्या अनावश्यक अटी तसेच कर्जमाफी संदर्भातील प्रलंबित प्रश्नांमुळे पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
ऐन दिवाळीत सण साजरा करण्याऐवजी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली होती. शेतकरी आर्थिक संकटात असताना बँकांकडून होणारी ही अडवणूक अत्यंत गंभीर बाब आहे. शाखाधिकाऱ्यांना निवेदन देताना शेतकरी समाधान वानखडे, सोमीनाथ एडके, श्रीराम वानखेडे, किशोर मोहिते, मनोहर अंभोरे, तेजस मोहिते, आनंद बोकाडे, संतोष सोळुंके, देवीदास सहाणे यांची उपस्थिती होती.
बँकात हेलपाटे
ऐन दिवाळीत सण साजरा करण्याऐवजी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली होती. शेतकरी आर्थिक संकटात असताना बँकांकडून होणारी ही अडवणूक अत्यंत गंभीर बाब आहे.