Cow slaughter, anger as video goes viral
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील मंगळबाजार भागात राहणाऱ्या अस्लम महेमूद कुरेशी याने गायीची कत्तल करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सकल हिंदू समाजाच्यावतीने सदर बाजार पोलिस ठाण्यात निवेदन देऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आरोपींवर मोकासह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
जालना शहरातील मंगळबाजारात भागात राहणाऱ्या अस्लम महेमुद कुरेशी याने गायीची कत्तल करतानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सकल हिंदू समाजात तीव्र पडसाद उमटले. सोमवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने सदर बाजार पोलिस ठाण्यात अस्लम महेमुद कुरेशी याच्यावर मोकासह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
सध्या हिंदू समाजाचे गणेशोत्सवासह इतर सण सुरू असताना जातीय तेढ निर्माण करून दोन समाजात दंगल घडविण्यासाठी असे प्रकार केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सदर व्हिडिओ २३ ऑगस्टचा असल्याची माहिती ऐकावयास मिळाली.
यावेळी मोठ्या संख्येने गौरक्षांसह बजरंग दल व सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाल्याचे दिसून आले.
या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात पडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वेळीच आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरात मोठ्या संख्येने अवैध कत्तलखाने सुरू असून त्यावर महापालिकेच्यावतीने कारवाई होत नसल्याचा आरोप आहे.
मंगळबाजार व दानाबाजार परिसरातील अवैध कत्तलखाने बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी नवीन जालन्याचे प्रभारी स्वच्छता प्रमुख कैलाश चांदणे यांना दिले आहेत.
गणेश विसर्जनापूर्वी आरोपींना अटक न झाल्यास जालना शहरात गणेश विसर्जन होणार नाही, असा इशाराही यावेळी पोलिसांना देण्यात आला आहे.
मंगळबाजारातील अस्लम महेमुद कुरेशी याने गाय कापतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला असून या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींना पाठीशी घालणार नसून कायदेशीर तरतुदी पाहून कारवाई केली जाईल, असे सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भारती यांनी सांगीतले.
जालन्याचे माजी आ. कैलाश गोरंट्याल यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. गायीला कापताना हिंदू समाजाला शिवीगाळ केल्याचेही यावेळी गोरंट्याल यांनी सांगितले. आरोपींवर लावलेली कलमे जामीनपात्र असल्याने त्यांच्यावर मोका लावावा अशी मागणीही गोरंट्याल यांनी केली.